Exclusive: नदी पलीकडे दारू पोहचविण्यासाठी निवडली सुनसान जागा
वणी तालुक्यातील दारूला मारेगाव पोलिसांचा हातभार
रवी ढुमणे, वणी: चंद्रपूर जिल्हात दारूबंदी होताच वणी परिसरातून दारू तस्करीला चांगलेच उधाण आले आहे. पोलिसांच्या धाकाने आता दारू तस्करांनी निर्जन स्थळ निवडले आहे. नदी पल्ह्याड दारू पोहचविण्यासाठी सुनसान जागेचा वापर व्हायला लागला आहे. या प्रकाराला मात्र मारेगाव पोलिसांचा हातभार लागत असल्याचे चित्र सध्या दिसायला लागले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होताच अनेक व्यवसायातील तरूण दारू तस्करीकडे वळले आहेत. पुर्वी कोळसा वाहतुकीत काम करणारे आता सप्लायर झाले आहेत. यातच वणी उपविभागातील मारेगाव, वणी, राजूर काॅलरी, मार्डी, कुंभा आदी मोठ्या गावातील दारू तस्करांनी विविध शक्कल लढवित दारू तस्करी केल्या आहेत. इतकेच नव्हे तर राजकीय क्षेत्रात जम बसविणारे सुध्दा या व्यवसायात चांगलेच रंगल्याचे ही बघायला मिळाले आहे. चंद्रपूर पोलिसांच्या कारवाया, त्यात वणी पोलीसांची धाड या प्रकाराने दारू तस्करांनी नवीन वाट शोधत आपला मोर्चा आता नदी पात्राकडे वळविला आहे.
मारेगाव तालुक्यातील गोरज, दांडगाव, शिवणी, आपटी आदी गावाच्या सीमेवरून नदी पात्राच्या मार्गाने दारू तस्करी करायला सुरूवात केली आहे. मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या हिवरा-गोरज चैफुलीवर दारू तस्कर उभे राहताना दिसू लागले आहेत. पलीकडील तालुक्यातील दारू तस्कर या सीमेवर येतात आणि वणी उपविभागातील दारू तस्करी करणारे आपल्या वाहनातून त्यांना दारू देतात असा काहीसा प्रकार अलिकडे बघायला मिळाला आहे.
पोलिसांची नजर चुकविण्यासाठी येथील तस्करांनी नवीन शक्कल लढवित गोरज हिवरा चौफुलीवर आपले बस्तान मांडले आहेत. दारू पुरवठा करणारे दारू विक्रेते त्यात पोलिसांची अलगत असलेली मदत यात दारूची तस्करी होताना दिसत आहे. मात्र मारेगाव पोलिसांच्या हद्दीतून नदी पात्रामार्गे दारू तस्करी होत असताना ते या प्रकाराला हातभार तर लावत नाही ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
(खोट्या कर्जमाफीचा पोळा, अटी अन् निकषात शेतकरी बेजार)
कधी न बघीतलेले राजकीय क्षेत्रातील चेहरे नदीकाठावर दिसायला लागल्याने कित्येकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एखाद्या गावाच्या ज्वलंत प्रश्नावर लढा देण्यासाठी त्या गावाला कधीही भेट न देणारे आता निर्जण स्थळी तस्करीसाठी जाताना बघायला मिळत आहे.