जितेंद्र कोठारी, वणी:
दिवस: सर्वसाधारण…. वेळ: सकाळी 11 वाजता…
एका रेती व्यावसायिकांच्या मोबाईलचा फोन अचानक खणखणतो…. रेतीवाले भाऊ फोन रिसिव्ह करतात…. पुढून आवाज येतो…
”गाड्या कुठे आहे ?”
इकडून उत्तर मिळते, ”घाटातून निघत आहे.”
फोन करणारा व्यक्ती घाईघाईत…. ”भाऊ… गाड्या थोड्या थांबवा ! अर्धा तासाने साहेब दौऱ्यावर निघणार आहे.”
आणि माहिती देणारा फोन ठेवतो…
रेती व्यवसायिक लगेच 4-5 सहकार्यांना फोन करतो व आदेश देतो. साहेबांचे घर आणि ऑफिसच्या गेटपासून ते शहरातून निघणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर नजर ठेवा. आपले प्रत्येक खबरी ऍक्टिव्ह करा. साहेब कोणत्या मार्गाने जाणार? कधी जाणार? कुठे जाणार? काय कामासाठी जाणार? किती वेळ थांबतील? परत किती वाजता येणार? या सर्व कार्यक्रमाची बितंबातमी द्या.
हा प्रसंग रेतीमाफियाशी संदर्भात आहे. यात रेती तस्करांना माहिती पुरवणारा खुद्द अधिकाऱ्यांचा वाहन चालक आहे. अधिकारा-याचा चालकच रेती तस्करांना सर्व माहिती पुरवत असल्याने रेती तस्करांचे चांगलेच फावत असून शासनाला मात्र चांगलाच चुना लागत आहे.
सदर कर्मचारी गाडीत बसण्यापूर्वी कॉल करून तर नंतर मिसकॉल किंवा एसएमएस करून अधिकाऱ्यांच्या प्रत्येक मूव्हमेंटची माहिती रेती व दारू तस्करांना पोहचवतो. या ‘वफादारी’च्या मोबदल्यात प्रत्येक रेती तस्कर ड्रायव्हर महाशयाला महिन्याकाठी ठराविक रक्कम व ओली पार्ट्या देतात. शासकिय वाहनाचा हा चालक दर महिन्याला तब्बल एक लाख रुपयांपर्यंत पदरी पाडत असल्याची खमंग चर्चा शहरात आहे.
कुंपणच शेत खात असल्याने रेड फेल
रेती तस्करीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महसूल व पोलीस अधिकारी अनेकदा रेती घाटापर्यंत शासकीय वाहनांने पेट्रोलिंग करतात. क्वचित प्रसंगीच त्यांच्या हाती अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर व चालक सापडतात. याचे कारण तेच आहे. कारण त्यांना बहुतांश वेळा टीप मिळाल्यामुळे अधिकाऱ्यांना रिकामे हाताने परतावे लागते. महसूल व पोलीस विभागामध्ये शासनाकडून पगार घेऊन रेती माफियांसाठी कर्तव्य बजावणाऱ्या झारीतील शुक्राचार्यमुळे चांगल्या अधिकाऱ्यांची कोंडी होत आहे.
वणी उपविभागातील महसूल व पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहन चालकांचे मोबाईल कॉल डिटेल काढल्यास अवैध व्यवसायिकांसोबत त्यांचे अर्थपूर्ण संबंध पूर्णपणे उघड होईल. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांचे वाहन चालकांची वर्षोनुवर्षे एकच ठिकाणी नियुक्ती असल्यामुळे अधिकारी कोणताही येवो त्यांना फरक पडत नाही.
उपविभागातील वणी, मारेगाव व झरी तालुक्यात रेती तस्करांना प्रशासनाकडून मोकळीक दिल्याचे चित्र मागील तीन महिन्यापासून बघायला मिळत आहे. अध्येमध्ये काही हायवा व ट्रॅक्टर पकडून दंडात्मक कारवाईसुद्दा करण्यात आली. मात्र आता बिना रॉयल्टी दिवसाढवळ्या रेतीचे वाहन शहराचे मध्येभागी रिकामे होत असताना प्रशासन डोळे झाकून बसला आहे.
वणी उपविभागात मोजके रेती घाटाचे लिलाव झाले असता वरोरा, माजरी, भद्रावती, रांगणा, भुरकी, आपटी, कोडशी, चारगाव, घुग्गुस, चंद्रपूर, व पैनगंगा नदीच्या खातेरा, दिग्रस, वठोली घाटातून दिवसरात्र रेती वाहतूक सुरू आहे.
महसूल खात्यामध्ये कर्तव्यदक्ष व डेंजर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका अधिकाऱ्यांच्या मुख्यालयात दररोज अवैध रेतीचे ट्रक खाली होत असल्याची पक्की माहिती आहे. मात्र सदर अधिकारीही ‘मी नाही त्यातली, कडी लावा आतली’ अशी भूमिका घेताना दिसत आहे.
हे देखील वाचा: