जितेंद्र कोठारी, वणी: झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन येथे बहुप्रतीक्षीत सिमेंट प्रकल्प सध्या चर्चेत आले आहे. या सिमेंट प्रकल्पामुळे वाघांच्या भ्रमंतीवर परिणाम होत असल्याचा दावा करत या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या मंजुरीबाबत फेरविचार करण्यासाठी राज्य शासनाने चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. समिती टिपेश्वर अभयारण्य ते ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प दरम्यान वाघांचे भ्रमण मार्गाचा अभ्यास करुन एका महिन्यात अहवाल सादर करणार आहे. समितीच्या अहवालावर सिमेंट प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे.
झरी तालुक्यातील मुकुटबन, पिंपरडवाडी व येडशी गावातील खासगी शेतजमीन तसेच पैनगंगा नदी खोऱ्यातील 467 हेक्टर वन जमीन ही सिमेंट कारखाना, पॉवर प्लांट, किंकर प्लांट व खदानीसाठी रिलायन्स समूहाला 2012 मध्ये मंजूर झाली. कालांतराने एम.पी. बिरला समूहाने रिलायन्स कडून संपूर्ण आरसीसीपीएलचे अधिग्रहण केले. एम.पी. बिरला समूहाने वर्ष 2018 पासून कारखाना निर्मितीसाठी युद्द स्तरावर निर्माणकार्यही सुरु केले. मात्र सदर प्रकल्प पैनगंगा नदी खोऱ्यात वाघ भ्रमण कॉरिडॉरला बाधित करत असल्याचे आरोप होत आहे.
वाघाच्या भ्रमंतीवर परिणाम कसा?
निर्माणाधिन सिमेंट प्रकल्प क्षेत्र टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य-ताडोबा-अंधारी आणि कावळ व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र कॉरीडोरमध्ये येतो. पांढरकवडा वनविभाग अंतर्गत झरी-जामनी तालुक्यातील हिरापूर, गोविंदपूर आणि पिंपरवाडी या गावात कम्पार्टमेंट नंबर C-26, C-27, और C-33 (A) मध्ये वाघ पालन क्षेत्र आहे. वाघ हा कॉरीडोरमध्ये एका क्षेत्रातून दुस-या क्षेत्रात भ्रमण करीत असतो. उदा. वाघ जर टिपेश्वरहून ताडोबा प्रकल्पाकडे भ्रमंती करीत असेल तर या भ्रमंतीच्या मार्गात मध्ये कंपनीच्या प्रकल्पाची जागा येते. व्याघ्र भ्रमण क्षेत्रात कृत्रिम हस्तक्षेप होतोय असा दावा वन्यप्रेमी करत आहे. तसे झाल्यास भविष्यात मानव विरुद्द वन्यजीव संघर्ष वाढण्याची भीतीही वन्यप्रेमी संघटनांनी व्यक्त केली आहे.
वन्यप्रेमी संघटनांचे विरोध तसेच यवतमाळ व पांढरकवडा वन विभागाचे नकारात्मक अहवालावरून आता शासनाने संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीत मुख्य वन संरक्षक प्रकाश लोणकर, मेळघाट टायगर रिजर्व हेड ज्योती बॅनर्जी, यवतमाळचे मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमजान विराणी व महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांचे समावेश करण्यात आले आहे.
तब्बल 2400 कोटीच्या निधीतून उभारण्यात येणारे आरसीसीपीएल सिमेंट प्रकल्पाचे निम्याहून अधिक बांधकाम पूर्ण झाले असता प्रकल्पाच्या भविष्यावर टांगती तलवार आहे. समिती सिमेंट प्रकल्पासह टिपेश्वर व ताडोबा अभयारण्याचा प्रत्यक्ष दौरा व वाघ भ्रमण क्षेत्राचा अभ्यास करून याबाबत अहवाल तयार करणार आहे. समितीच्या अहवालावरून करोडो रुपयांच्या व बहुप्रतिक्षित सिमेंट प्रकल्पाचे भविष्य ठरणार आहे.
हे देखील वाचा: