वणी येथील भूमी अभिलेख कार्यालयात गोंधळ, आमदार संतापले
नागरिकांच्या तक्रारीवरून आमदारांनी धरले कर्मचा-यांना धारेवर
जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथील कायम वादात राहणारे कार्यालय अशी ओळख असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या ढिसाळ कारभारा विरुद्ध नागरिकांची तक्रारी वाढली आहे. अनेक जणांच्या तक्रारीनंतर गुरुवार 22 जुलै रोजी वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार स्वतः नजुल कार्यालयात पोहचले. नागरिकांच्या तक्रारीबाबत त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता नेहमीप्रमाणे स्टाफ कमी असणे, दस्तावेज संगणकावर अपलोड न होणे व इतर कारणे सांगण्यात आले. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आमदार चांगलेच भडकले. यावेळी शासनाने ठरवून दिलेल्या वेळात नागरिकांचे काम झालेच पाहिजे, अशी तंबी आमदारांनी दिली.
रहदारीचे प्लॉट मोजणी, येणे केलेली जमीन मोजणे, शेतकरी पिकासाठी कसत असलेल्या शेत जमीन मोजणी, फेरफार आदि विविध प्रकारच्या जमीन मोजणीचे तालुक्यातील कामकाज उपअधिक्षक भूमि अभिलेख या कार्यालयाकडून केले जाते. शेत मोजणीचे पैसे भरूनही मोजणी न करणे, कार्यालयाच्या ठिकाणी न राहणे, आलेल्या नागरिकांशी उद्धट बोलणे, वेळेवर काम न करणे आदी तक्रारींची खच पडली आहे.
वणी येथील भूमी अभिलेख कार्यालयात दलालांमार्फत लवकर कामे केली जातात. तर सर्वसामान्य नागरिकांचे कामे होत नाही. असा नागरिकांचा आरोप आहे. भूमी अभिलेख कार्यालयात मागील 3 वर्षांपासून स्थायिक उपअधीक्षक नसून प्रभारी अधिकारी महिन्यातून दोन तीन दिवस कार्यालयात येतात. 3 ते 4 कर्मचार्यांच्या भरोशावर सदर कार्यालयाचा कारभार मनमानीपणे चालत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
भूमी अभिलेख कार्यालयाच्या अनागोंदी कारभार विरुद्ध अनेक आंदोलने झाले. एवढेच नव्हे तर वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी भूमी अभिलेख कार्यालयाच्या विरोधात उपोषण आंदोलन केले होते. तर मनसे उपाध्यक्ष राजू उंबरकर व स्वतः आमदार यांनी दोनदा कार्यालयात जाऊन राडाही केला होता. मात्र कारभारात काहीही सुधारणा झाली नव्हती. आता तरी कार्यालयाचा कारभार योग्य प्रकारे चालून प्रशासकीय कामात सुधारणा व्हावी अशी अपेक्षा सर्वसामान्य करीत आहे.
हे देखील वाचा:
बाजार करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला प्रियकराने पळवून नेले
वणी तालुक्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस, नदीनाले ओव्हरफ्लो