शाळेकडे फिरवली विद्यार्थ्यांनी पाठ, शाळेत शुकशुकाट

शिक्षक पॉजिटिव्ह निघाल्याने पालक 'निगेटिव्ह'

0

निकेश जिलठे, वणी: आज सोमवारी दिनांक 23 नोव्हेंबर पासून माध्यमिक शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. आज प्रत्यक्ष शाळेचा पहिला दिवस असताना तालक्यात विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. शहरातील शाळेत अल्प उपस्थिती होती तर तालुक्यातील सुमारे 60 टक्के शाळेत विद्यार्थीच फिरकलेच नाही. ग्रामीण भागात तर विद्यार्थी शेतीच्या कामात व्यग्र होते. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस शुकशुकाटात गेला.

कोरोनाच्या काळात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद आहे. सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. अखेर 23 नोव्हेंबरपासून स्थानिक प्रशासनाने निर्णय़ घेऊन शाळा सुरू करावी अशी सूचना केली. दरम्यान शिक्षकांची कोरोना चाचणी करून शाळा सुरू करावी, शाळेत विद्यार्थ्यांची थर्मल स्कॅनिंग करावी, शाळेत सॅनिटायझर व मास्कचा वापर करावा इत्यादी मार्गदर्शक तत्वे देण्यात आले. अखेर आज प्रत्यक्ष शाळेचा पहिला दिवस उजाडला. मात्र आधीच अनेक शिक्षक पॉजिटिव्ह आल्याने याची पालकांनी धास्ती घेतली व अधिकाधिक पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवण्याकडेच भर दिला. 

पालकांचा संमतीपत्र देण्यास नकार
शहरी तसेच मोठ्या गावांमध्ये काही विद्यार्थ्यांची थोडी बहुत उपस्थिती होती. ग्रामीण भागातील शिंदोला, शिरपूर, कायर, पुनवट, मार्डी, चिखलगाव, मंदर, वेळाबाई तसेच शहरातील शाळेत 25 ते 30 टक्के विद्यार्थी उपस्थित होते. तर ग्रामीण भागातील मेंढोली, कळमना, परमडोह, मोहूर्ली, वांजरी, घोन्सा, साखरा (कोलगाव), ब्राम्हणी, भालर आदी शाळेत एकही विद्यार्थी उपस्थित नव्हता. पालकांना स्वत:च्या जबाबदारीवर आपल्या पाल्याला शाळेत पाठवत असल्याचे संमतीपत्र द्यायचे होते. मात्र यात शाळेने जबाबदारी झटकल्याचे दिसत असल्याने अनेक पालकांनी संमतीपत्रच भरून दिले नाही.

विद्यार्थ्यी नसल्याने तालुक्यातील अनेक शाळांनी आज पालक सभा घेतली. तर कुठे शिक्षक सभा झाली. आदर्श विद्यालय, शिंदोला येथे पालक सभा घेण्यात आली. सरपंच विठ्ठल बोंडे, पंचायत समिती सदस्य संजय निखाडे यांच्यासह निवडक पालक उपस्थित होते. पालकांचे संमतीपत्र घेऊन उद्या पासून शाळा सुरू होणार आहे. तर मार्डी येथे 25 टक्के विद्यार्थी उपस्थित होते. शाळेत विद्यार्थ्यांची थर्मल स्कॅनिंग, ऑक्सिजन लेव्हलची तपासणी करण्यात आली. पालकांचे संमतीपत्र घेऊन वर्ग सुरू होणार आहे. घोन्सा येथील आदर्श विद्यालयात एकही विद्यार्थी उपस्थित नव्हता. शिक्षकांची सभा पार पडली. शाळा सुरू होणार म्हणून बहुतांश शाळेत वर्ग, परिसर स्वच्छ करण्यात आला.

शिक्षक पॉजिटिव्ह निघाल्याने पालक ‘निगेटिव्ह’
आठ महिन्यानंतर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारे मरगळ आली होती. आता शाळा उघडणार म्हणून विद्यार्थ्यांमध्ये जबरदस्त उत्साह होता. चांगल्या वातावरणात पाल्य जाणार म्हणून पालकांमध्येही उत्सुकता होती. मात्र शिक्षक पॉजिटिव्ह निघाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वणी तालुक्यात 21 शिक्षक पॉजिटिव्ह आले आहेत. तर मारेगावत 6 शिक्षक पॉजिटिव्ह आले आहेत. शिवाय अद्याप अनेक शिक्षकांचे कोरोना रिपोर्ट येणे बाकी आहे.

सुरक्षेच्या प्रश्नाचे घोंगडे भिजत…
शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचा आदेश दिला आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षीततेसाठी बहुतांश शाळेकडे आवश्यक ते साहित्यच नाही. यात थर्मल स्कॅनिंग मशिन, सॅनिटायझर याचा समावेश आहे. काही शाळांनी सुरक्षेसाठी साहित्य विकत घेतले आहे. काही शाळांनी पैसे नसल्याचे कारण देत याकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाने हा खर्च वेतनेत्तर अनुदानातून करण्याची सूचना केली आहे. मात्र निधी नसल्याचे कारण देत शाळा व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यातच अनेक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकांकडून वसुली करीत आहे. मात्र बहुतांश शिक्षक याला विरोध करीत आहे. त्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शाळा व्यवस्थापन किती गंभीर आहे हे दिसून येत आहे.

आज प्रत्यक्ष शाळेचा पहिला दिवस शुकशुकाटात गेला. अनेक महिन्यांपासून शाळा बंद असल्याने बहुतांश मुलांची शिक्षणाविषयीची ओढ कमी झाली आहे. ग्रामीण भागातील मुले शेतीच्या कामात गुंतले आहे. त्यामुळे मुलांना शाळेकडे आकर्षित करणे हे शिक्षकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. 

हे पण वाचा…

वणीत भाजपतर्फे वीजबिलाची होळी

हे पण वाचा…

रेती तस्करांमध्ये खळबळ, शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई

Leave A Reply

Your email address will not be published.