रेती तस्करांमध्ये खळबळ, शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई

रेती भरलेले 3 हायवा सह 42 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

जब्बार चीनी, वणी: वाळू घाटांचा लिलाव नसताना पैनगंगा नदीतून रेतीचा अवैधरित्या उपसा करून चोरट्या मार्गाने वाहतूक करणारे 2 हायवा व 1 ट्रक शिरपूर पोलिसांनी पकडले. कारवाईत 17 ब्रास रेतीसह 42 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त करून तिन्ही ट्रक चालकांना अटक करण्यात आली आहे. पोलीस कार्यवाहीमुळे रेती तस्करांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. तर महसूल विभागाचे काम आता पोलीस विभाग करत असल्याने महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पैनगंगा नदीच्या वडा व जुगाद गावालगत घाटातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रेती उपसा करून वाहतूक केल्या जात असल्याची गुप्त माहिती शिरपूरचे नवीन ठाणेदार सचिन लुले यांना मिळाली. माहितीच्या अनुषंगाने रात्र गस्त करीत असताना शिंदोला ते आबईफाटा रस्त्यावर रेतीची वाहतूक करणारे 3 ट्रक आढळले.

पोलिसांनी हायवा (MH29 BE 7474), (MH34 BG 8793) व ट्रक (MH34 AB 7713) ताब्यात घेऊन त्यात भरलेली 17 ब्रास रेती जप्त केली. या कार्यवाहीत चालक अमोल मेश्राम रा. मोहदा, तैराम सिमून वडा रा. शिंदोला व शेख मूर्तजा रा. मुकूटबन यास अटक कऱण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल करून आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली.

अवैध धंद्यासाठी राजकीय बळाचा वापर?
प्राप्त माहितीनुसार महसूल विभागाच्या आशीर्वादाने वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू आहे. एका राजकीय पक्षाच्या पदाधिकऱ्यांचा सहकार्याने मागील 2 महिन्यापासून पैनगंगा नदीतून दिवस-रात्र उपसा करून रात्रीच्या वेळी तब्बल 8 ते 10 हायवा रेतीची वाहतूक केली जाते. बांधकाम व्यावसायिक व खाजगी लोकांना 6 हजार रुपये प्रति ब्रास विकत असलेल्या रेतीमध्ये सर्वांचा वाटा असल्याचे बोलले जाते. मनुष्यबळाची कमतरता व रेती तस्करांकडून हल्ला होण्याची भीतीच्या आड महसूल विभागाने रेती माफियांना मोकळीक दिल्याची चर्चा आहे.

शिरपूर पोलिसांनी पकडलेल्या रेती ट्रकवर कायदेशीर कार्यवाही झाल्यास लाखों रुपयांचा दंड बसणार आहे. मात्र वृत्तलिहीत पर्यंत मधला मार्ग काढण्याची तडजोड सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.

महसूल विभाग रेती तस्करांच्या दावणीला?
दोन दिवसांआधी चिखलगाव येथे रेती तस्करांवर कार्यवाही केली होती. त्यानंतर लगेच शिरपूर पोलिसांनी रेती तस्करांवर कार्यवाही केली. रेती तस्करीवर आळा घालणे महसूल विभागाचे काम आहे. मात्र सध्या पोलीस विभाग महसूल विभागाचे काम करीत आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून याबाबत खमंग चर्चा शहरात रंगत आहे. याकडे उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

हे पण वाचा…

आज तालुक्यात पुन्हा 7 पॉजिटिव्ह

 

हे पण वाचा…

रेतीची तस्करी करणा-या दोन ट्रॅक्टर चालकांना अटक

Leave A Reply

Your email address will not be published.