वणीत घरफोडीचे सत्र थांबता थांबेना… दुकान फोडून 70 हजार लंपास

तोंडावर स्कार्फ बांधून चोरी, सीसीटीव्हीत घटना कैद

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात घरफोडीचे सत्र सुरू असताना आता चोरट्यांनी आपला मोर्चा दुकानाकडे वळवला आहे. सुविधा कापड केंद्रनंतर आता मुकुटबन टी पॉइंटवरील जैन बिल्डिंग सोल्युशन हे हार्डवेअरचे दुकान चोरट्यांनी फोडले.सोमवारी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे सीसीटीव्हीत सापडू नये यासाठी चोरट्यांनी तोंडावर रुमाल बांधून दुकानात प्रवेश केले.

सविस्तर वृत्त असे की सुरेश खिवंसरा यांचे मुकुटबन टी पॉइंटवर जैन बिल्डींग सोल्यूशन नावाने दुकान आहे. रविवारी रात्री नेहमी प्रमाणे दुकान मालकांनी बंद केले. सकाळी ते दुकानात गेले असता त्यांना दुकानाच्या आत असलेल्या मॅनेजरच्या केबिनच्या दराचे काच फोडलेले आढळले. त्यांनी सीसीटीव्ही चेक केले असता पहाटे 3.30 वाजता चोरट्यांनी दुकानाच्या मागील भागातील टिन वाकून आत प्रवेश केले. त्यानंतर केबिनचे काच टॉमीच्या साहाय्याने फोडून आत प्रवेश केला व ड्रॉवर मधील 70 हजार रुपये लंपास केले. चोरट्याने संपूर्ण चेहऱ्यावर कापड बांधलेले होते. दुकान मालक सुरेश खिंवसरा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

चोरीच्या एकही घटनेचा अद्याप उलगडा नाही
शहरात एक महिन्यापासून सातत्याने घरफोडीच्या घटना घडत आहे. आता चोरट्यांनी आपला मोर्चा दुकानाकडे वळवला आहे. या आठवड्यात चोरट्यांनी दोन दुकाने फोडली. शहरात इतक्या चोरी होताना अद्याप एकही प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

Comments are closed.