जितेंद्र कोठारी, वणी: बँकेत गर्दी होऊ नये. लोकांना बँक बंद झाल्यानंतरही पैसे मिळावे यासाठी ठिकठिकाणी एटीएमची सुविधा देण्यात आली आहे. मात्र वणीत कोणत्याही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जा, त्यात पैसेच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी वणी येथील खासगी आणि राष्ट्रीयकृत अशा सर्वच बँकांच्या बहुतांश एटीएममध्ये पैशाचा खडखडाट पाहायला मिळाला. त्यामुळे नागरिकांचा अख्खा दिवस एक एटीएम ते दुसऱ्या एटीएमच्या चकरा मारण्यात गेला. या नेहमीच्या रडगाण्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत ‘वणी बहुगुणी’ने फॅक्ट चेक केली असता यात अधिकाधिक एटीएम नापास झाल्याचे आढळून आलेत.
शहरात सुमारे 20 च्या जवळपास एटीएम आहे. सोमवारी यातील एचडीएफसी, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, आईसीआईसीआई, ऍक्सिस बँक, आईडीबीआई बँकेच्या एटीएममध्ये रोकड नसल्यामुळे ग्राहकांची तारांबळ उडाली. शहरात ही परिस्थिती कायमच राहत असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. ग्राहकांच्या या गैरसोयीकडे बँका कानाडोळा करत असल्याने संताप व्यक्त केला जातोय.
बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...
राष्ट्रीयकृत व खाजगी बँकेतील एटीएम मशीनमध्ये रोकड भरण्याची कामे खाजगी अजेंसीमार्फत केली जातात. परन्तु रोकड भरणारी खासगी कंपनी नागपूरची असल्यामुळे एटीएम मशीनमध्ये रोकड संपल्यास दुसऱ्या दिवशीच रोकड भरली जाते. सोमवारी सायंकाळी 5 वाजता दरम्यान हा गोंधळ लक्षात आल्यामुळे ‘वणी बहुगुणी’ने याबाबत शहरातील विविध बँकेच्या शाखा प्रबंधका सोबत संपर्क साधला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
रिअलिटी चेकमध्ये अधिकाधिक एटीएम नापास काही खातेदारांच्या तक्रारीनंतर ‘वणी बहुगुणी’ने रियालिटी चेक केले. यामध्ये शहरातील एक-दोन एटीएम वगळता इतरत्र पैशाचा खडखडात दिसून आला. एटीएममध्ये कुठे रोकड संपल्याचा तर कुठे मशीन नादुरुस्त असल्याचा फलक लावण्यात आल्याचे दिसून आले. केवळ स्टेट बँकच्या साई मंदिर शाखा व कॅनरा बँकच्या एटीएममधून व्यवहार सुरु होता.
ऍक्सिस बँकेचे एटीएम बंद तर कॅनरा बँकेचे एटीएम सुरू
अनेक लोक शहरात एटीएम असल्याने खेड्यापाड्यातून निश्चिंत होऊन शहरात येतात. मात्र एटीएममध्ये पैसेच नसल्याने त्यांच्यावर हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. यात बराच वेळ खर्च होतो. तर अनेक लोक बस किंवा ऍटोने शहरात येतात. त्यामुळे त्यांना केवळ पैसे काढण्यासाठी एका एटीएममधून दुस-या एटीएममध्ये पायीच चकारा माराव्या लागतात. याकडे बँकेने लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.