रवि ढुमणे, वणी: रविवारी दुपारी अचानक आलेल्या पावसात विजेचे तांडव सुरु झाले. त्यात तिघेजण ठार तर एक बैल मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
वणी परिसरातील राजूर कॉलरी, मारेगाव तालुक्यातील वागदरा आणि झरीजामनी तालुक्यातील पाचपोर येथे रविवारी दुपारी आकाशात अचानक ढग दाटून आले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. अचानक आलेल्या पावसात विजानी जणू कहरच केला. कोणालाही काही सुचण्याआधी विजांचे तांडव सुरू झाले. यात राजूर कॉलरी येथील शेळ्या राखणाऱ्या प्रेमानंद वानखडे ७१ याने स्वतःचा बचाव करण्यासाठी कडुनिंबाच्या झाडाचा आसरा घेतला. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास वीज झाडावर पडली त्यात प्रेमानंद जागीच ठार झाला.
दुसरी घटना मारेगाव तालुक्यातील वागदरा येथील गजरा पोडात राहणारा गणेश पोतु आत्राम हा युवक शेतकरी शेतात असताना वीज पडून ठार झाला. त्याच्यासोबत असलेला एक बैल पण विजेच्या झटक्याने ठार झाला.
तर झरी जामनी तालुक्यातील शिबला गावाजवळील पाचपोर येथील बिजाराम घुलराम ठाकरे (५५) हे शेतात बैल चारत असताना वीज पडून ठार झाले. पाचपोर येथील शेतकरी शेतातुन घरी परतला नसल्याने शोधाशोध सुरू झाली सदर घटना आज उघडकीस आली.