गांजा ओढताना तीन तरुणांना अटक, वणी पोलिसांचे गर्दुल्यांवर धाडसत्र

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील निर्जन ठिकाणी गांजा ओढणा-यांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 3 तरुणांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. शहरात मोठ्या प्रमाणात तरुण व शाळकरी मुलं गांजाच्या आहारी गेले असून शहरातील ओसाड ठिकाण हे त्यांचा अड्डा बनला आहे. पोलीस गर्दुल्यांवर तर कारवाई करीत आहे. मात्र सप्लायर अद्यापही मोकाट का असा सवाल उपस्थित होत आहे? पोलिसांनी ड्रग्स सप्लायरवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा वणीकर व्यक्त करीत आहे.

सविस्तर वृत्त असे की ठाणेदार प्रदीप शिरस्कर हे बुधवारी दिनांक 17 मे रोजी सपोनि दत्ता पेंडकर व पोकॉ सुहास मंदावार यांच्यासह पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान रात्री 8.45 वाजताच्या सुमारास दीपक चौपाटी जवळील जत्रा मैदान येते एक तरुण गांजा सारख्या अमली पदार्थाचे धुरा द्वारे सेवन करीत असल्याचे आढळून आले. त्याला विचारणा केली असता त्याने गांजा ओढत असल्याचे सांगितले. सदर तरुण हा राजूर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

रात्री सतीघाट जवळील विटभट्ट्याजवळ दोन तरुण गांजा ओढताना आढळून आले. यातील एक कारवाई ही रात्री 9.30 वाजताच्या सुमारास तर दुसरी कारवाई ही रात्री 10.30 वाजताच्या सुमारास करण्यात आली. यातील एक तरुण हा सर्वोदर चौकातील रहिवासी आहे. तर दुसरा तरुण हा कावडी गोवारी येथील रहिवासी आहे. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

या तिन्ही आरोपींवर गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 (NDPS) कायद्याच्या कलम 27 व 8 (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ठाणेदार प्रदीप शिरस्कर, सुहास मंदावार व दत्ता पेंडकर यांनी केली.

शहरातील ओसाड ठिकाणं बनले गर्दुल्यांचा अड्डा
शहरातील अनेक ओसाड ठिकाणी गांजासारख्या मादक द्रव्यांचे सेवन होते. यात शाळकरी मुलांपासून ते कॉलेजच्या तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. व्यसनाधीन झालेले या मुल व तरुणांना अनेक वर्षांपासून गावातूनच गांजा मिळतो. हे सर्व चांगल्या घरातील मुलं असून या व्यसनामुळे त्यांची तरुणाई व्यर्थ जात आहे. गावाबाहेरील अनेक ओसाड लेआऊट, नदी रोडवरील मैदान, ओसाड बगिचा व मैदान हे सध्या गांजा फुकण्याचे ठिकाण झाले आहे. सदर गांजा हा शहरातूनच पुरवला जात असून हा माल तेलंगणातून येत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी अनेकांना गांजा ओढताना अटक केली आहे. मात्र त्यांच्याकडून सप्लायरची कोणतीही माहिती न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी या ड्रग सप्लायर्सवर तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा: 

दरोडा टाकण्याचा डाव पोलिसांनी उधळला, जंगली पीर जवळ मध्यरात्री थरार

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.