ब्रेकिंग न्युज – ब्राह्मणी गावालगत आज पहाटे वाघाचा धुमाकूळ

वाघाच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी... मंगळवारी रात्री पिंपरी गावात शिरला वाघ...

जितेंद्र कोठारी, वणी : ब्राह्मणी परिसरातील आजची पहाट वाघाच्या हल्ल्याने उजाडली. शौचास गेलेल्या एका युवकावर वाघाने जीवघेणा हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला वणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सदर घटना आज गुरुवार 24 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजता दरम्यान तालुक्यातील निळापूर (ब्राह्मणी) येथे घडली. उमेश पासवान (35) रा. बिहार असे जखमीचे नाव असून तो मजूर आहे. 

प्राप्त माहितीनुसार निळापूर मार्गे हायटेंशन विद्युत वाहिनीचे कार्य सुरु आहे. इथे अनेक परप्रातिंय मजूर काम करतात. काही मजूर गावालगत शेतात झोपडी बांधून कुटुंबासह राहतात. आज पहाटे 4 वाजता दरम्यान उमेश पासवान शौचास जाण्यासाठी शेतात गेला. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर जोरदार हल्ला केला. वाघाने उमेशच्या मानेवर व गळ्यावर पंज्याने वार केला. त्यात तो गंभीर झाला.

वाघाने हल्ला करताच उमेशने आरडा ओरड केला. त्यामुळे परिसरात राहणारे लोक धावून आले. त्यामुळे वाघाने तिथून धूम ठोकली. घटनास्थळी उमेश गंभीर रित्या जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ वणी येथील लोढा हॉस्पिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू जखमी मजुराची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

मंगळवारी रात्री कोलारपिंपरीत वाघ
मंगळवारी दिनांक 22 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पिंपरी (कोलार) गावात वीज पुरवठआ खंडीत झाला होता. दरम्यान रात्री 8.30 वाजताच्या सुमारास पिंपरी गावात वाघाने शिरकाव केला. वाघाने चक्क गावात भ्रमण केले व वाघ पुढे गावाबाहेर गेला. ही माहिती वा-यासारखी गावात पसरली. दरम्यान संपूर्ण गाव यामुळे भयभीत झाले. गावातील नागरिकांनी परिसरातील गावक-यांना फोन करून याबाबत माहिती देत सतर्क राहण्याचे सूचना केली.

याची माहिती तात्काळ वनविभाग व पोलीस विभागाला देण्यात आली. त्यांनी गावक-यांना सोबत घेऊन रात्री उशिरा पर्यंत परिसरात सर्च ऑपरेशन राबवले. वाघ आढळून आला नाही. मात्र वाघाच्या पायाचे ठसे (पगमार्क) आढळून आले. बुधवारीही वनविभागातर्फे सर्च ऑपरेशन सुरू होते. आतापर्यंत गावाच्या बाहेर असणा-या वाघाने आता गावात एन्ट्री केल्याने परिसरातील नागरिक चांगलेच दहशतीत आले आहे.

हे देखील वाचा: 

वणीतून मिळालेल्या पिछाडीने केला दिग्गजांचा पत्ता कट ?

 

Comments are closed.