रासा शिवारात वाघाचा बैलावर हल्ला, बैल जखमी

वाघाच्या हल्ल्यामुळे परिसरात दहशत

जितेंद्र कोठारी, वणी: वाघाच्या हल्यात बैल जखमी झाला. सदर घटना आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान रासा-सुकणेगाव शिवारात घडली. वेळीच परिसरात असलेल्या शेतमजुरांनी आरडाओरड केल्याने बैलाचा जीव वाचला आहे. मात्र या हल्ल्यामुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गजानन रामकृष्ण धांडे हे रासा येथील रहिवाशी आहे. आज दुपारी ते बैल चारण्यासाठी शेतात गेले होते. दुपारी 2 वाजताच्या सुमारास वाघाने बैलावर अचानक हल्ला चढविला. हल्ला चढवताच बैलाच्या आवाजाने परिसरात असलेल्या शेतमजुरांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी आरडाओरड करताच वाघाने तिथून धूम ठोकली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रासा, सुकनेगाव, गोडगाव शिवारात वाघाची दहशत
गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून रासा, सुकनेगाव, गोडगाव शिवारात वाघाचा वावर आहे. दरम्यान वाघाने अनेकदा पशुंवर हल्ला केला. यात गाय, बकरी, वासरू यांचा मृत्यू झाला तर काही जखमी झाले. पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी गोडगाव येथील रहिवाशांनी वनविभागाला याआधी निवेदन दिले होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.

वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी शेतमजूर जीव मुठीत घेऊन शेतात काम करीत आहे. वाघाच्या दहशतीमुळे संध्याकाळ होण्याच्या आधीच शेतकरी, शेतमजूर घरी परततात. मोठी अनुचित घटना घडण्याच्या आधी वाघाचा बंदोबस्त करावा अशी अपेक्षा परिसरातील रहिवाशी करीत आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.