सावधान ! कुर्ली बंदीत वाघ… ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
गुराख्याला दिसले वाघाच्या पंजाचे ठसे
विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील कुर्ली बंदीत गुराख्याला वाघाच्या पंजाचे ठसे दिसले. त्याअनुषंगाने खात्री करून सदर बिटचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. आर. वालकोंडावार यांनी परिसरातील ग्रामस्थांना माहिती दिली. परिणामी परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वणी तालुक्यातील कुर्ली गावाला लागून दाट जंगल आहे. कुर्ली बीट क्र. १०, ११ ,१२ आणि १३ चा विस्तार मोठा आहे. सदर जंगलात चंदनासह विविध प्रकारची वृक्षसंपदा व प्राणी आहे. सुमारे पाच ते सहा दशकांपूर्वी सदर जंगल घनदाट होते. त्याकाळी या वनक्षेत्रात वाघांचा वावर असल्याचे ऐकिवात होते. परंतु विविध कारणांसाठी चोरट्या मार्गाने झालेल्या वृक्षतोडीमुळे वनसंपत्ती कमी झाली. त्यामुळे वन्यप्राण्यांची संख्या झपाट्याने कमी झाली.
मात्र नुकतेच गुराख्याला गुरे चारताना वाघाच्या पंजाचे ठसे दिसले. सदर माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वालकोंडावार , वनपाल चौधरी यांच्या कानी पडताच घटनेची सत्यता पाहून परिसरातील कुर्ली, शेवाळा, खांदला, गोपालपूर, नवेगाव, कवळसी आदी गावात दवंडी द्वारे जंगलात वाघांचा वावर असल्याची माहिती ग्रामस्थांना दिली.
दवंडी द्वारे जंगलात गुरे चारण्यास व इंधनासाठी जाण्यास मनाई करण्यात आली. सदर जंगलालगत शेती कसणाऱ्या शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेती कशी कसायची , असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे. सदर वाघांचा वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी आहे.