वाघाची पाणी पिण्यासाठी थेट बेड्याजवळील शेतात एन्ट्री

मार्डीजवळ बोदाड परिसरात वाघाचे दर्शन, शेतकरी भयभीत

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यात वाघाचे दर्शन आता नित्याचेच झाले आहे. आज येथे तर उद्या तेथे असे वाघाचे दररोज दर्शन होत आहे. आज दि. 6 डिसेंबरला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान मार्डी जवळील पारधी बेड्याजवळ वाघाने दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकरी भयभीत झाले आहे.

वणी तालुक्यात हैदोस घालून दोघांचा जीव घेतल्यानंतर आता वाघाने आपला मोर्चा आता मारेगाव तालुक्यात वळवल्याचे दिसत आहे. आज दि.6 डिसेंबरला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान मार्डी जवळ असलेल्या छोट्याशा पारधी बेड्याजवळ वाघ अचानक अवतरला. वाघाला तहान लागल्याने बेड्याजवळ असलेल्या एका शेतामध्ये वाघ पाणी पीत असल्याचे दृष्टीस पडला. बेड्याजवळ असलेल्या बारू पवार हे आपल्या शेतामध्ये गव्हाला पाणी देत होते. त्याच दरम्यान वाघ त्या शेतामध्ये आला आणि तेथे पाणी प्यायला लागला.

त्यावेळी बारू पवार हे पाणी सुरु करून बाजूलाच जाऊन बसलेले होते. अचानक शेतात वाघ दिसल्याने त्यांची घाबरगुंडी उडाली आणि ते तसेच लपून वाघाला पाहायला लागले. वाघाच्या पाऊलखुणा त्यांच्या शेतामध्ये स्पष्टपणे उमटलेल्या दिसून येत असून वाघाच्या या आगमनाने परिसरात भीतीचे वातावरण आणखी गडद झालेले आहे.

वणी नंतर आता मारेगाव तालुक्यात धास्ती
मारेगाव वणी परिसरात नेहमीच वाघाची दहशत पाहायला मिळते. नुकतेच वणी परिसरात वाघाने काही जीव घेतल्यानंतर आता मारेगाव तालुक्यातील मार्डी परिसरात वाघाने प्रवेश केलेला आहे. मार्डी परिसरात वाघाच्या लपण्याची खूप सारी ठिकाणे आहेत. मार्डी परिसरात फिसकीचे जंगल, कानडा जंगल, दापोरा जंगल अशी तीन जंगले आहेत. त्यापैकी फिसकीचे जंगल हे परिसरात मोठे असून या ठिकाणी मागील वर्षी वाघाने अनेकदा दर्शन दिले होते. यावर्षही वाघ अधूनमधून येथे दर्शन देत होता. पण आज अचानक गावालगतच दर्शन दिल्याने परिसरातील नागरिक दहशतीत आल्याचे दिसत आहे. वाघ आल्याची चर्चा पसरताच शेतामधील कामगार कामे सोडून घराकडे पळाल्याचीही चर्चा असून वनविभागाने फक्त चर्चा आणि पाहणी करण्याऐवजी यावर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

Comments are closed.