अखेर हल्लेखोर वाघिण जेरबंद, रॅपिड रेस्क्यू टीमची कार्यवाही
परिसरातील रहिवाशांचा एकच जल्लोष
अयाज शेख, पांढरकवडा: तालुक्यातील अंधारवाडी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून धुमाकुळ घालणा-या वाघिणीला अखेर आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी जेरबंद करण्यात आले. बोरी परिसरात या वाघिणीला वनविभागाच्या मदतीने अमरावती येथील रॅपिड रेस्क्यू टीमने पकडून बंदीस्त केले आहे. या वाघिणीच्या हल्ल्यात अंधारवाडी परिसरातील एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर एका शेतक-याला जखमी केले होते. याशिवाय या वाघिणीने अनेक जनावरांचाही फडशा पाडला होता. हल्लेखोर वाघिण जेरबंद झाल्याने कळताच परिसरात एकच जल्लोष करण्यात आला आहे.
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पाटणबोरी जवळील अंधारवाडी परिसरात टी-टी 2 सी 1 या वाघिणीची दहशत पसरली होती. आधी या वाघिणीने परिसरातील बकरी, गाय, म्हशींवर हल्ला करून जनावरांचा फडशा पाडला होता. मात्र त्यानंतर वाघिणीने मनुष्यावर हल्ला करणे सुरू केले. काही दिवसांआधी या वाघिणीने एका शेतक-यावर हल्ला केला होता. यात सदर शेतकरी जखमी झाला होता. त्यानंतर 19 सप्टेंबर रोजी या वाघिणीने शेतात निंदण करणा-या लक्ष्मी दजांडे या महिलेवर हल्ला करून ठार केले होते.
महिलेचा मृत्यूनंतर अंधारवाडी परिसरातील रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. परिसरातील रहिवाशांनी वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. अखेर या वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. वाघिणीला पकडण्यासाठी अमरावती येथील रॅपिड रेस्क्यू टीम तैनात करण्यात आली होती. यासह डॉक्टारांची नियुक्ती देखील करण्यात आली होती. तसेच वाघिणीला जेरबंद केल्यावर घेऊन जाण्यासाठी नागपूर येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरचे पिंजरा असलेले वाहनही बोलवण्यात आले होते.
दोन ते तीन दिवसांपासून पाटणबोरी परिसरातील जंगलात वनविभाग व रॅपिड रेस्क्यू टीमद्वारा शोध सुरू होता. अखेर सकाळी अंधारवाडी परिसरात ही वाघिण आढळून आली. सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास रॅपिड रेस्क्यू टीमने या वाघिणीला जेरबंद केले. वाघिणीला पकडल्याची माहिती मिळताच परिसरातील रहिवाशांनी एकच जल्लोष केला. रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली व वाघिणीला घेऊन जाणा-या गाडीच्या मागे एकच गर्दी केली.
सदर कार्यवाही वन परिश्रेत्र विभाग (प्रादेशिक) व अमरावती येथील रॅपिड रेस्क्यू टीम द्वारा करण्यात आली. 7 लोकांचे पथक यावेळी उपस्थित होते. यावेळी वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेली महिला लक्ष्मीबाई दडांगे यांचा टीपेश्वर अभयारण्यात सिनियर गाईड असलेला मुलगाही उपस्थित असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर वाघिणीला कुठे घेऊन जाणार आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) संगीता कोकणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
वाघिणीच्या हल्लामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पाटणबोरी शेतशिवारात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. त्यातच एका महिलेचा मृत्यू झाल्याने जनक्षोभ उसळला होता. या वाघिणीला तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांसह स्थानिक नेत्यांनीही केली होती. अखेर या वाघिण जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.