असा आला परत चोरीला गेलेला ट्रॅक्टर!
सुरेंद्र इखारे, वणीः छोटी मोठी वस्तू चोरीला जाणे आपण समजू शकतो. मात्र एक ट्रॅक्टरच अख्ख्या ट्रॉलीसह चोरीला गेल्यामुळे ट्रॅक्टर मालकाला धक्काच बसला. रासा येथील रमेश सखाराम बोंडे यांच्या मालकीचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर चोरीला गेल्याची तक्रार स्थानिक प्रगतीनगर येथील मनेश डोमाजी तुराणकर यांनी वणी पोलीस स्टेषनला केली. ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. 29 ए.डी.9441 व ट्रॉली एम.एच. 34 एम. 2352 चोरील्या गेल्याच्या तक्रारीवरून भादंवि कलम 379 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वात ट्रॅक्टर चोरीचा छडा लावण्यासाठी डी.बी. पथक कामाला लागले.
ट्रॅक्टरच चोरीला जाणे ही बाब अत्यंत धक्कादायकच होती. ठाणेदार खाडे यांनी आपल्या तपासाची गती वाढविली. तपासाच्या दिशा व्यापक केल्यात. अनेक मुखबीर, खबरी या कामाला लावले. ही छोटी मोठी वस्तू असती तर गोष्ट निराळी होती. मात्र ट्रॉलीसह ट्रॅक्टरच चोरीला जातो हे मोठे आव्हान होते. घटना मोठी होती. आव्हानदेखील मोठे होते. त्या ट्रॅक्टर व ट्रॉलीची विल्हेवाट लावून चोरांनी काहीही करण्याची शक्यता होती. शेतीचा हंगाम सुरू झाला. पावलोपावली ट्रॅक्टरचं काम येणार होतंच. मालकाचे बरेच पैसे यात गुंतलेले असतात.
वणी पोलीस अत्यंत काळजीपूर्वक तपासकार्याचे नियोजन करीत होते. मुखबीरांकडून खात्रीची बातमी आली. प्रफुल्ल साधुजी किनाके (27) रा. महाडोळी, चंद्रपूर आणि मंगेश जनार्दन सोनटक्के (22) रा. वरोरा, चंद्रपूर यांनी हा ट्रॅक्टर चोरल्याचे पोलिसांना कळले. वरोरा तालुक्यातील येसा येथे हे आरोपी असल्याची खात्रीदायक बातमी मिळाली. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे आणि डी. बी. पथकाने तिथूनच आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली ताब्यात घेतली. वणीतील वरोरा रोडवरून ट्रॅक्टर कसा चोरला याची पूर्ण हकिकत आरोपींनी सांगितली.
शेतकऱ्यासाठी बैल जसा जीवाभावाचा असतो. आधुनिक शेतीतंत्रज्ञान आल्यावर ट्रॅक्टरसारखे यंत्रदेखील त्यांच्या जीवनाचा घटक असतात. आपला ट्रॅक्टर परत मिळाल्यामुळे ट्रॅक्टरमालक रमेश सखाराम बोंडे सुखावले. त्यांनी वणी पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
ही कार्यवाही पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वात स.पो.नि. मुरलीधर गाडामोडे, पोहवा डोमाजी भादिकर, लेखनिक पोना सचिन गाडगे, डी. बी. पथक कर्मचारी पोहवा सुदर्षन वानोळे, पोना सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, नितीन सलाम, अमित पायोम, दीपक वांड्रसवार आणि अजय शेंडे यांनी केली. वणी पोलिसांच्या या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.