अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त, चालकावर गुन्हा

मंदर येथे वणी पोलिसांची मध्यरात्री कारवाई....

पुरुषोत्तम नवघरे, वणी: अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर वणी पोलिसांनी कारवाई केली. सोमवारी मध्यरात्री (मंगळवारी, 5 ऑगस्ट 2025 रोजी) ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एक ब्रास रेती व ट्रॅक्टर असा सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांना खबरीकडून मंदर परिसरात अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस कॉन्स्टेबल सचिन मरकाम यांनी त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल श्रीनिवास गोंलावार यांच्यासह मंदर येथे धाड टाकली. यावेळी MH 29 CB 7742 क्रमांकाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर रेती वाहतूक करताना आढळला.

पोलिसांनी चालकाला थांबवून रेती वाहतूक परवानाबाबत (रॉयल्टी) विचारणा केली असता चालकाकडे सदर परवाना आढळून आला नाही. चालकाने त्याचे नाव दिनेश नानाजी गुहे (वय 31, रा. मंदर, ता. वणी) असल्याचे सांगितले. पोलिसांनी ट्रॅक्टरची तपासणी केली असता, त्यात अंदाजे 1 ब्रास रेती (किंमत 7,000 रुपये) आढळली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिसांनी 4 लाख 50 हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि 7,000 रुपयांची रेती असा एकूण 4 लाख 57,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपीवर भारतीय न्याय संहिता बीएनएसच्या कलम 303(2) आणि जमीन महसूल कायदा, कलम 48(8) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी, वणी व ठाणेदार वणी यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

Comments are closed.