वणीचे ठाणेदार शाम सोनटक्के यांची यवतमाळ येथे बदली

कर्तव्यात कसूर ठेवल्याच्या कारणावरून उचलबांगडी, रामकृष्ण महल्ले वणीचे नवीन ठाणेदार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व ठाणेदार शाम सोनटक्के यांची कर्तव्यात कसूर ठेवल्याच्या कारणास्तव यवतमाळ येथे बदली करण्यात आली आहे. त्यांना आता यवतमाळ येथील जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेत पाठवण्यात आले आहे. तर वणीच्या ठाणेदारपदाची जबाबदारी यवतमाळ येथील जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेतील कार्यरत पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांना सोपवण्यात आली आहे. याशिवाय वणी पोलीस ठाण्यातील सपोनि माया चाटसे यांच्याकडे निर्भया पथक वणी उपविभागाची पथक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. आज याबाबत आदेश पारित करण्यात आला आहे. ठाणेदार वैभव जाधव यांच्या बदलीनंतर 4 सप्टेंबर 2021 रोजी त्यांना प्रभारी ठाणेदार म्हणून पदभार दिला होता. त्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी त्यांना ठाणेदार पदी नियुक्त करण्यात आली. मात्र 6 महिन्याच्या आतच त्यांची उचलबांगडी करण्यात आली.

दिनांक 29 जानेवारी रोजी अमरावती येथून आलेल्या सहा. पोलीस महा निरिक्षक (डीआयजी) अमरावती परिक्षेत्राच्या पथकाने वणीत ठिकठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यावर धाडसत्र राबवले होते. या पथकाने 4 मटका अड्ड्यावर धाड टाकत 43 जणांवर गुन्हा दाखल केला होता याशिवाय शहरातील 2 अवैध तंबाखू विक्रेत्यांवरही कारवाई केली होती. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला होता. गेल्या काही वर्षांतील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात होती.

या प्रकरणामुळे वणी पोलीस ठाण्याची अब्रु वेशीवर टांगली गेली होती. एकीकडे छोटी मोठी कारवाई करत वणी परिसरातील अवैध धंदे बंद असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे मात्र शहरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय फोफावला होता. याची माहिती अमरावती येथील पोलीस निरीक्षक कार्यालयात पोहोचली. यावरून अमरावतीतील पथकाने वणीत येऊन रेकी केली. अनेक ठिकाणावर स्वत: जाऊन मटका अड्डा सुरू असल्याची खात्री केली. तसेच शहरात सुरू असलेल्या प्रतिबंधीत तंबाखूच्या विक्रीबाबतही संपूर्ण पुरावे गोळा केले.

परिसरात अवैध धंदे जोमात सुरू असल्याची खात्री झाल्यावर ठरलेल्या दिवशी दुपारच्या सुमारास एकाच वेळी धाड टाकली होती. या कारवाईत सुमारे 13.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणानंतरच वरीष्ठ पातळीवरून कारवाईचा बडगा उगारला जाण्याची चर्चा सुरू झाली होती. काही दिवसांनी वणीत अवैध धंद्यांना चालना देण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना जवाबदार ठरविण्यात आले व त्यानुसार 23 कर्मचा-यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता.

यात 4 कर्मचा-यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली तर 19 कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावत पगारवाढ (इंक्रिमेन्ट) का रोखू नये याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले होते. मात्र ही कारवाईही चर्चेचा विषय ठरली होती. कारण यात पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई सोडून कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवला गेल्याचा आरोप झाला होता. 

दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ !
वणी पोलीस ठाण्याअंतर्गत होणा-या गुन्ह्याची तीव्रता कमी दाखवण्यासाठी अनेकदा गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आऱोप व्हायचा. यात मुख्यत: दुचाकी चोरी व शेतमाल, शेती अवजारे चोरी इत्यादी गुन्ह्यांचा समावेश होता. याबाबत मोठ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये नाराजी होती.

नवीन ठाणेदारांसमोर मोठे आव्हान
पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले हे आता वणी पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. वणीत क्रिकेट सट्टा व मटका व्यवसायात देखील दर दिवशी लाखोंची उलाढाल होते. याशिवाय इतर अवैध व्यवसायही मोठ्या प्रमाणात चालते. वणीत चालणा-या अवैध व्यवसायावर अंकुश ठेवून शहरातला अवैध धंद्यांपासून मुक्त करण्याचे आव्हान महल्ले यांच्यासमोर आहे. यात ते यशस्वी होणार की नाही हे येणा-या काळात कळणार.

हे देखील वाचा:

वणीकरांचा मनसेला कौल… पण सर्व विरोधकांची एकी: वारे नगरपालिकेचे भाग 9

Comments are closed.