वणीतील एका व्यावसायिकाला नागपूर पोलिसांकडून अटक

80 लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप

जितेंद्र कोठारी, वणी: नागपूर येथील एका कोळसा व्यावसायिकाची 80 लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी वणी येथील व्यावसायिक मनीष बतरा याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. बुधवार 9 मार्च रोजी लकडगंज ठाण्यातील पोलीस पथकाने बतरा यांना वणी येथील त्यांच्या प्रतिष्ठान मधून ताब्यात घेतले. अटकेबाबत वणी पोलीस ठाण्यात नोंद करून बतरा यांना नागपूर घेऊन गेल्याची माहिती आहे. लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये व्यावसायिक मनीष बतरा विरुद्ध भादंविच्या कलम 420 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष बतरा यांच्या अटकेमुळे वणीतील व्यापारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार फिर्यादी नितीन मुरलीधर अग्रवाल, रा. वर्धमान नगर नागपूर यांचे मित्तल एनर्जी ऑफ इंडिया या नावाने कोळसा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. वणी येथील लालपुलिया परिसरातील एस.बी. ट्रेडर्सचे संचालक मनीष शामसुंदर बतरा यांच्या मागणीवरून मित्तल एनर्जी ऑफ इंडिया कंपनीने वर्ष 2016-17 मध्ये तब्बल 2 कोटी रुपयांचा कोळसा पुरवठा केला.

पुरवठा केलेल्या कोळशाच्या रक्कमेपैकी 80 लाख रुपये गैरअर्जदार मनीष बतरा यांनी थकविले. वारंवार मागणी करूनही बतरा यांनी नितीन अग्रवाल याना उर्वरित रक्कम दिली नाही. एस.बी. ट्रेडर्सच्या कोळसा डेपो जवळच नागपूर येथील प्रमोद भाबडा यांचा कोल डेपो होता. मित्तल एनर्जी ऑफ इंडिया कंपनीने प्रमोद भाबडा यांच्या मार्फत मनीष बतरा यांना कोळसा विकला होता.

वाद सुरू असताना जुलै 2020 मध्ये दोन्ही पक्षांमध्ये बैठक झाली. त्या बैठकीमध्ये मनीष बतरा यांनी 80 लाख रुपये देणे असल्याचे कबूल केले. तसेच ऑगस्ट 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत दरमहा 15 लाख रुपये देण्याचा लेखी करारनामा करून दिला. मात्र जाने 2021 पर्यंत त्यांनी एकही रुपया दिला नाही.

अखेर फिर्यादी नितीन मुरलीधर अग्रवाल, रा. नागपूर यांनी जून 2021 मध्ये न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयात मनीष बतरा विरोधात खटला दाखल केला. न्यायालयाच्या आदेशावरून लकडगंज पोलिसांनी 11 फेब्रुवारी 2022 रोजी या प्रकरणी मनीष शामसुंदर बतरा, रा. बेलदारपुरा, वणी, जि. यवतमाळ विरुद्ध कलम 420 भादविच्या अनव्ये गुन्हा दाखल केला. त्यानंतर प्रकरणाची चौकशी करून 9 मार्च रोजी अटक केली आहे. या घटनेमुळे वणीतील व्यापारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा:

पोलिसांची वॅन आली अन् ‘झुंड’ची पळापळ, शासकीय मैदानावर राडा

वणीचे ठाणेदार शाम सोनटक्के यांची यवतमाळ येथे बदली

वणीकरांचा मनसेला कौल… पण सर्व विरोधकांची एकी: वारे नगरपालिकेचे भाग 9

Comments are closed.