निर्गुडा नदीच्या पुलावर ट्रकला भीषण अपघात, कठडे तोडून ट्रक कोसळला नदीत

शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल.... बघ्यांची एकच गर्दी,,,

जितेंद्र कोठारी, वणी: डोलोमाईट आणण्यासाठी अडेगाव येथे जाणारा एक 12 चाकी ट्रकचा मुकुटबन रोडवरील निर्गुडा नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातामुळे ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक थेट निर्गुडा नदीत कोसळला. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला. वैभव महादेव गानफाडे (26) रा. विठ्ठलवाडी वणी असे ट्रक चालकाचे नाव आहे. रात्रीपासून या बचाव पथक घटनास्थळी पोहोचले होते. सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास बचाव पथकाला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. 

सविस्तर वृत्त असे की वैभव महादेव गानफाडे (26) हा विठ्ठलवाडी येथील रहिवाशी होता. तो गेल्या 6-7 वर्षांपासून चालक मालक पद्धतीने घरचा हायवा (ट्रक) चालवायचा. गेल्या काही वर्षांपासून त्याचे अडेगाव येथील डोलोमाईट कम्पनीत काम सुरू होते. तेथून घेतलेले डोलोमाईटची तो बाहेर गावी पोहोचवायचा. बुधवारी रात्री तो नेहमीप्रमाणे ट्रक घेऊन अडेगाव येथे जात होता. 

रात्री 10 वाजताच्या सुमारास मुकुटबन रोडवरील निर्गुडा नदीच्या पुलावर वैभवच्या ट्रकची पुढे जाणा-या दुस-या ट्रकला धडक बसली. त्यामुळे वैभवचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक पुलाच्या उजव्या बाजूचे (रेल्वे पुलाच्या बाजूने) कठडे तोडत पुलावरून थेट नदीत कोसळला. चालकाची बाजू नदीतील पाण्यात फसल्याने चालकाला बाहेर निघता आले नाही.

अपघात झाल्यानंतर काही वेळातर या मार्गावरून जाणा-या प्रवाशांना पुलाचे कठडे तुटलेल्या अवस्थेत दिसले. त्यामुळे त्यांनी पाहणी केली असता त्यांना अपघात होऊन ट्रक नदीत कोसळल्याचे दिसून आले. काही लोकांची तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

बचाव पथकाला पाचारण
सध्या पूर परिस्थितीमुळे यवतमाळ येथील शोध व बचाव पथक तालुक्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच या पथकाला घटनास्थळी बोलवण्यात आले. तसेच ट्रक बाहेर काढण्यासाठी क्रेन देखील बोलावण्यात आली. मात्र ट्रकची कॅबिनची बाजूस गाळात फसल्याने बचाव कार्यास अडचण निर्माण झाली. अंधारामुळे रात्री बचाव कार्य स्थगित करण्यात आले.

सकाळी शहरात या घटनेची माहिती मिळताच पुलावर बघ्यांची एकच गर्दी झाली होती. वाढती गर्दी बघून पोलिसांनी हा मार्ग बंद केला. सकाळी 2 क्रेन द्वारा ट्रकची कॅबिन उचलून बचाव पथकाच्या मदतीने कॅबिनमधून मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र चालकाचा मृतदेह स्टेअरिंगमध्ये अडकलेला असल्याने मृतदेह काढण्यास अडचण येत होती. सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास अथक परिश्रमानंतर बचाव पथकाला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर लगेच चालकाचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. 

बघ्यांची एकच गर्दी, वाहतूक विस्कळीत
सकाळपासून बचाव कार्याला सुरूवात झाली होती. मात्र शहरात या घटनेची माहिती मिळताच पुलावर बघ्यांची एकच गर्दी झाली होती. वाढती गर्दी बघून बचाव कार्यास अडथळा येत होता. पोलिसांनी वणी-मुकुटबन हा मार्ग बंद केला होता. सुमारे दोन तास या मार्गावरील वाहतूक बंद होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान बघ्यांची गर्दी आटोक्यात आणताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

हे देखील वाचा: 

धक्कादायक: पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

अल्पवयीन कॉलेज विद्यार्थिनीला फूस लावून पळविले

Comments are closed.