धक्कादायक: पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

बहिणीला गावी सोडायला गेलेला भाऊ घरी परतलाच नाही... शेलू येथील घटना, दुपारी पुराच्या पाण्यात आढळला मृतदेह

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास शेलू गावाजवळ पुराच्या पाण्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. प्रमोद बाबाराव काकडे (27) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून तो शेलू येथील रहिवाशी होता. तो सोमवारी बहिणीला सोडण्यासाठी शेलूवरून नांदेपेरा येथे गेला होता. मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. आज बुधवारी दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास गावक-यांना गावालगत  पुराच्या पाण्यात एक मृतदेह आढळून आला. गावक-यांनी माहिती काढली असता त्यांना प्रमोद हा घरी परतला नसल्याचे कळले. त्यांनी मृतदेह बाहेर काढला असता तो मृतदेह प्रमोदचा असल्याचे स्पष्ट झाले. वाहून गेल्याने प्रमोदचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

गेल्या तीन दिवसांपासून अतीवृष्टी व वर्धा नदीला पूर आल्याने शेलू गावाला पाण्याचा वेढा आहे. प्राप्त माहिती नुसार, मृतक प्रमोदच्या घरी सणावारासाठी गावाहून त्याची बहिण आली होती. शेलू व नांदेपेरा या गावांच्या मध्ये वाघाडा व हलपर असे दोन नाले आहेत. या नाल्याचे पाणी सातत्याने वाढत असल्याने प्रमोद बहिणीला सोडण्यासाठी शेलूवरून नांदेपेरा येथे गेला होता. त्याने बहिणीला नांदेपेरा येथे सोडले. तिथून त्याने घरी एकाच्या मोबाईलवरून कॉल करून बहिणीला सोडल्याची माहिती दिली. तसेच काही वेळाने परत येणार असे ही सांगितले. मात्र त्यानंतर तो घरी पोहोचलाच नाही. अखेर आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला.

गावक-यांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र गावाला पुराचा वेढा असल्याने पंचनामा कसा करावा हा प्रश्न सध्या पोलिसांसमोर आहे. शेलू गावालगत हलपर हा नाला आहे. पुरामुळे या नाल्याने आक्रमक रूप धारण केले आहे. नाला पार करताना प्रमोद वाहून गेला असावा असा अंदाज गावकरी व्यक्त करीत आहे. पंचनामा व उत्तरिय तपासणी झाल्यावर घटनेचे अधिक तपशील स्पष्ट होणार आहे. (व्हिडीओ- गावालगत दुपारी आढळला मृतदेह)

हे देखील वाचा

पूर अपडेट्स: कवडशी येथील 8 जणांना पथकाद्वारे रेस्क्यू

गाय चोरीच्या संशयावरून खरबडा परिसरात दोन गटात राडा

 

अल्पवयीन कॉलेज विद्यार्थिनीला फूस लावून पळविले

Comments are closed.