वणी शहरात वाढतेय भाईगिरीचे आकर्षण, तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात

भर चौकात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या दोघांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात मागील काही महिन्यापासून भाईगिरी व दादागिरीच्या घटना वाढल्या आहेत. अल्पवयीन व तरुणाईमध्ये भाईगिरीचे वाढते आकर्षण चिंतेचा विषय बनला आहे. खेळण्या-शिकण्याच्या वयातील किशोरवयीन मुलांना भाईगिरीचे भलतेच वेड लागत आहे. अशातच भरचौकात तलवार घेऊन फुटपाथ दुकानदारांना धमकवणाऱ्या दोन तरुणांना वणी पोलिसांनी अटक केली. 

ब्लॅक डायमंड सिटी म्हणून संपूर्ण राज्यात वणी शहराची ओळख आहे. मात्र आता या शहराची वाटचाल क्राईम सिटीच्या दिशेने होताना दिसत आहे. शहरात तलवार, सत्तुर व चाकू घेऊन दहशत पसरविण्याचे अनेक प्रकरणाची पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे. सोमवारी 6 नॉव्हे. रोजी येथील प्रमुख आणि गजबजलेल्या शिवाजी चौकात दोन तरुण हातात धारदार तलवार व सत्तूर घेऊन फुटपाथ विक्रेत्यांना धमकविण्याची घटना उघडकीस आली. 

घटने बाबत वणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी शिवाजी चौकाकडे धाव घेतली. पोलीस पथकाने वन विभाग कार्यालय जवळ दोन्ही तरुणांना सौम्य बळाचा वापर करून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 3 फूट लांबीची एक धारदार तलवार व 1 फूट लांब धारदार सत्तुर व एक दुचाकी जप्त केली. आरोपीचे नाव पत्ता विचारले असता एकाने आपले नाव शैलेंद्र उर्फ शंकर साईनाथ बावणे (25) रा. चिंचोली, ता. राजुरा, जि. चंद्रपूर तर दुसऱ्या आरोपीने आपले नाव बादल राजेश दुपारे (25), रा. कोंडण्यवाडी, वणी असल्याचे सांगितले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्यावर शस्त्र अधिनियमनुसार गुन्हा दाखल केला.

सदरची कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सपोनि माधव शिंदे, सफौ सुदर्शन वानोळे, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, वसीम शेख, गजानन कुडमेथे यांनी केली.

शहरात अवैध शस्त्र व अमली पदार्थ येतात कुठून ?

यवतमाळ शहरानंतर आता वणी शहरात अवैध शस्त्राच्या धाकावर दहशत निर्माण करण्याची घटना वाढत आहे. शहरात चंद्रपुरमार्गे अवैधरित्या घातक शस्त्र तसेच अमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याचे बोलले जाते. शहरातील अनेक अल्पवयीन मुलांना गांजा, अफीम, हेरोईन व इतर अमली पदार्थांचा व्यसन जडले आहे. नशेच्या आहारी जाऊन अल्पवयीन तसेच तरुण वयातील मुलं गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे. पोलीस विभागाने शहरात अवैध शस्त्रसाठा तसेच अमली पदार्थ शोध मोहीम राबविणे गरजे आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.