प्रेमनगरमध्ये धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक

विवेक तोटेवार, वणी: वणीत शनिवार 9 सप्टेंबर रोजी प्रेमनगर परिसरात दोन इसम धारदार शस्त्र घेऊन धमकावत असल्याचे वणी पोलिसांना समजले. माहितीवरून वणी पोलिसांनी सदर परिसरातून दोघांना अटक करून त्यांच्याकडून एक धारदार शस्त्र व एक दुचाकी वाहन जप्त केली. त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवार सकाळी दोन इसम त्यांची मोपेड (MH29 BS4213) ने प्रेमनगर परिसरात हातात धारदार शस्त्र घेऊन ओरडत असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली. माहितीवरून वणी पोलिसांनी सदर ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना पाठविले. जाऊन बघितले असता दोन इसम तेजस मनोज भगत (19) रा. भीमनगर, साहिल वीरेंद्र खडसे (19) रा. सम्राट अशोक नगर वणी हे हातात एक चाकू घेऊन फिरत असल्याचे आढळले.

पोलिसांनी त्यांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वाहन व एक चाकू असा एकूण 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर कलम 4/25 शस्त्र अधिनियम सहकलम 506 भारतीय दंड विधान नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव पोलीस उपनिरीक्षक सुदाम असोरे, विकास धडसे, शुभम सोनूले, वसीम शेख, सागर सीडाम, शंकर चौधरी, सुनील नालगंटीवार यांनी केली.

Comments are closed.