बहुगुणी डेस्क, वणी: ट्रॅक्टरने गावात लाकडं न नेल्याच्या रागातून दोन भावांनी ट्रॅक्टर चालकाला जीवे मारण्याची धमकी दिली तर त्याच्या मालकावर कु-हाड उगारली. या मारहाणीत मालकाला कु-हाडीचा लाकडी दांडा लागल्याने ते जखमी झाले. आरोपींनी केवळ मारहाणच केली नाही. तर लाकडं आणण्यासाठी नेलेल्या ट्रॅक्टरवर कु-हाडीने आघात करीत ट्रॅक्टरची चांगलीच तोडफोड केली. यात ट्रॅक्टर मालकाचे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे. सोमवारी दिनांक 21 एप्रिल रोजी रात्री 7 ते 10 वाजताच्या सुमारास बंदीवाढोणा येथे ही घटना घडली.
तक्रारीनुसार, फिर्यादी संजय लक्ष्मीनारायण जयस्वाल (55) हे सोनेगाव ता. वणी येथील रहिवासी असून ते गावातील पोलीस पाटील आहे. ते शेती करतात. त्यांच्याकडे शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरवर योगेश शेरबहादुर यादव हा चालक म्हणून काम करतो. शेतीसाठी पुरक व्यवसाय म्हणून ते इतर वेळी त्यांचे ट्रॅक्टर भाड्याने देतात. बंदीवाढोणा शिवारातील एका शेतक-याने शेणखत टाकण्यासाठी जयस्वाल यांचे ट्रॅक्टर भाड्याने घेतले होते. सोमवारी दिनांक 21 एप्रिल रोजी संध्याकाळी चालक योगेश हा शेणखत घेऊन बंदीवाढोणा येथील शेतात शेणखत घेऊन गेला होता. चालकाने शेणखताची ट्रॉली शेतात उतरवली.

बंदीवाढोणा गावात आरोपी महेश मेरचंद चव्हाण (40) व त्याचा भाऊ आरोपी प्रवीण मेरचंद चव्हाण (38) हा राहतो. ते यावेळी जवळच्याच शेतात होते. त्यांनी चालकाला आम्ही नाल्यात लाकडे तोडून ठेवलेले आहेत. ते लाकडं गावात नेऊन आमच्या घरी टाकशील. त्यासाठी तुला 500 रुपये भाडे देतो असे सांगितले. चालक तयार झाला. तो नाल्याच्या दिशेने जाऊ लागला. पण दरम्यान दोन्ही भावाने भाड्यावरून चालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. चालकाला शिविगाळ करीत ते कु-हाड घेऊन चालकाच्या अंगावर धावले. जीव वाचण्यासाठी चालकाने ट्रॅक्टर तिथेच ठेवला व पळ काढला.
चालक योगेश यादव याने झालेली घटना आपला मालक संजय जयस्वाल याला सांगितली. रात्री संजय हे त्यांच्या पुतण्या अंकीत रविकांत जयस्वाल यांना घेऊन बंदीवाढोणा शेतशिवारात ट्रॅक्टर आणण्यासाठी जात होते. दरम्यान रात्री 10 वाजताच्या सुमारास बंदीवाढोणा गावाजवळील रोडवर महेश मेरचंद चव्हाण व त्याचा भाऊ प्रवीण मेरचंद चव्हाण उभे होते. त्या दोघांनी संजय जयस्वाल यांना अडवले. त्यांनी जयस्वाल यांच्या वाद घालीत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. एका भावाने अंगावर कु-हाड उगारली. मात्र संजय यांनी वार अडवला. मात्र कु-हाडीचा दांडा त्यांच्या डोक्यावर बसला. यात ते जखमी झालेत. दरम्यान संजय यांचा पुतण्या व गावातील एकाने हा वाद सोडवला. याआधी एक खून केला आहे. माझ्या नादाला लागला तर तुझाही मुडदा पाडतो, अशी जीवे मारण्याची धमकी मारहाण करणा-या दोन भावांनी दिली.
ट्रॅक्टरचे लाखोंचे नुकसान
वाद सुटल्यानंतर जयस्वाल हे त्याच्या पुतण्यासह ट्रॅक्टर आणायला गेले. तिथे त्यांना ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झालेले आढळले. बॅटरीचे वायर तोडलेले होते व बॅटरी बाजूला फेकलेली होती. डिझेल टँकला लावलेली नळी कु-हाडीने फोडलेली होती. सर्व टायरची हवा सोडून टायरवर कु-हाडीने प्रहार केला होता. तसेच बोनेट व लाईटवर कु-हाडीने वार करून लाईट व बोनेटचे नुकसान केले होते. यात जयस्वाल यांचे सुमारे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले.
जयस्वाल यांनी तातडीने मुकुटबन पोलीस ठाणे गाठत आरोपी महेश मेरचंद चव्हाण व त्याचा भाऊ प्रवीण मेरचंद चव्हाण यांच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी दोघांविरोधात बीएनएसच्या कलम 115 (2), 118(1), 126(2), 296, 3(5), 324(5), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Comments are closed.