देवकार्य करताना नदीच्या प्रवाहात 2 जण बुडाले, 1 तरुण बेपत्ता

भास्कर राऊत, मारेगाव: देवकार्यासाठी वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या 2 जण नदीच्या प्रवाहात वाहून गेले. यातील एकाला बाहेर काढण्यात यश आले मात्र दुसरी व्यक्ती नदीच्या प्रवाहात वाहून गेली. मारेगाव तालुक्याच्या वेशीवर असलेल्या सांवगी येथे आज शुक्रवारी दिनांक 5 मे रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विकास अमर येडमे वय अंदाजे 20 असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. तो कोसारा येथील रहिवासी आहे. त्याचा युद्धपातळीवर शोध सुरू असल्याची माहिती आहे. 

सावंगी येथे वर्धा आणि वना नदीचा संगम आहे. त्यामुळे या गावाला अध्यात्मिक महत्त्व प्राप्त आहे. अनेक जण पवित्र कार्य करण्यासाठी या संगमावर येत असतात. विशेष म्हणजे वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ अशा तीन जिल्ह्यांना जोडणारा हा संगम आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नदीकाठावरील दिंदोडा घाटावर वरोरा तालुक्यातील बामर्डा येथील एका कुटुंबीयांचे देवकार्य होते. त्यानिमित्ताने त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक व समाजातील लोक या देवकार्यासाठी सावंगी संगमावर आले होते. 

या कार्यासाठी मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील येडमे कुटुंबीयही गेले होते. सकाळी 7 वाजताच्या सुमारास काही लोक आंघोळ करून बाहेर आले. तर कोसारा येथील विकास व त्याचा बाम्बर्डा येथील एक नातेवाईक असे दोघे पाण्यात आंघोळ करीत होते. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीच्या पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले.

कवडू येडमे यांचा वाचवण्याचा प्रयत्न
आंघोळ करून कोसारा येथील कवडू येडमे हे नदीकाठी आले होते. त्यांना त्यांच्यासह आलेले दोन तरुण बुडताना आढळले. कवडू यांनी लगेच पाण्यात उडी टाकली. त्यांनी बाम्बर्डा येथील तरुणाला बाहेर काढले. तर विकास याचा हात धरून त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दोधांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात कवडू यांच्या हाताने विकासचा हात सुटला व विकास पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला. सध्या विकासचा युद्ध पातळीवर शोध सुरू असल्याची माहिती आहे. 

सततच्या पावसाने केला घात
मागील आठ ते दहा दिवसापासून सर्वत्र जोरदार वादळवाऱ्यासह पाऊस सुरु आहे. या पावसाने नदी नाल्याना पूर आलेला आहे. त्यामुळे देवकार्यवेळी आंघोळ करते वेळी नदीमध्ये उतरलेल्या भाविकांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि हा अनर्थ घडला असे बोलले जात आहे. तसेच येडमे कुटुंबीय ज्या ठिकाणी आंघोळीसाठी गेले होते. तिथे डोह सदृश खड्डा असल्याचेही बोलले जात आहे. तसेच रेतीच्या अवैध उपस्याने जागोजागी खड्डे पडलेले आहे. त्यामुळे आंघोळीला जाणाऱ्या व्यक्तींना पाण्याचा अंदाज येत नसल्याची तक्रार भाविकांची आहे. 

नदीवर भाविकांची गर्दी असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष
मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल भाग आहे. सावंगी संगमावर आदिवारी समाज मोठ्या प्रमाणात देवकार्यासाठी जातो. गेल्या दोन वर्षांपासून ही संख्या झपाट्याने वाढली आहे. काही प्रसंगी सुमारे 500 ते 1000 लोकांचा जनमुदायही हजर असतो. आज देखील अशीच गर्दी होती अशी माहिती आहे. मात्र एवढी गर्दी असतानाही प्रशासनातर्फे सुरक्षेच्या दृष्टीने याकडे संपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

Comments are closed.