वणी येथील वकिलाचा दुचाकी अपघातात मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी : धावत्या दुचाकी समोर अचानक आलेल्या रानडुक्कराला धडक बसून झालेल्या अपघातात गंभीर जखमी वणी येथील एका वकिलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऍड. सतीश नांदेकर (48) रा. तलाव रोड, वणी असे मृत वकीलाचे नाव आहे. 

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील दरा (साखरा) येथील मूळ व हल्ली वणी येथे वास्तव्यास असलेले ऍड. सतीश नांदेकर हे गुरुवार 4 मे रोजी न्यायालयीन कामाकरीता आपल्या दुचाकीने मारेगाव येथे गेले होते. मारेगाव येथून परत वणी येत असताना गौराळा फाटा जवळ अचानक एक रानडुक्कर त्यांच्या दुचाकीसमोर आला. धावत्या दुचाकीची रानडुक्कराला जोरदार धडक लागून सतीश नांदेकर रस्त्यावर पडले. यात त्यांच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर नागरिकांनी तात्काळ मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृति गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे नेण्यात आले. चंद्रपूर येथे उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे 3 वाजता दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

दुचाकी चालकांना हेल्मेट वापरण्याचा आवाहन

हामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर धडकून तसेच रस्त्यावर कुत्रा, जनावर, वन्यप्राणी आडवा आल्याने झालेल्या अपघातात तालुक्यातील अनेक दुचाकीस्वारांना नाहक जीव गमवावा लागला. बहुतांश अपघातात डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याची नोंद आहे. दुचाकी चालकांनी योग्यरीत्या हेल्मेटचा वापर केल्यास अपघाताच्यावेळी डोक्याला गंभीर इजा पोहचत नाही. खासकरून राज्यमार्ग व महामार्गावर दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. वणी बहुगुणीतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की महामार्गावर दुचाकी चालवताना आयएसआय प्रमाणित हेल्मेटचा वापर करावा. लक्षात घ्या…! घरी कुणीतरी तुमची वाट पाहत आहे.

Comments are closed.