तालुका प्रतिनिधी, वणी: नदीवर कपडे धूत असताना अचानक धरणाचे पाणी सोडल्याने प्रवाहात वाढ झाली. त्यामुळे कोना येथील दोन चुलत बहिणी नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना दि.10 गुरुवारी दुपारी घडली. दुसऱ्या दिवशी त्यातील एक जिवंत तर दुसरी मृत अवस्थेत आढळून आली आहे.
आचल शंकर परचाके (19) आणि ज्योती श्रीकृष्ण परचाके (20) या वणी तालुक्यातील कोना येथील रहिवाशी असून त्या दोघी चुलत बहिणी आहे. गुरुवार दुपारी 2 वाजताच्या दरम्यान गावशेजारून वाहणाऱ्या नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.
दरम्यान वर्धा नदीत धरणाचे पाणी सोडल्याने अचानक पाण्याची पातळी वाढली. यावेळी आलेल्या पाण्याच्या जोरदार लोंढ्यात दोघीही वाहून गेल्या. दि. 11 शुक्रवारी दुपारच्या सुमारास ज्योती बेशुद्धावस्थेत माजरीलगत मासेमारी करणाऱ्यांना आढळून आली.
तिला उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तर शोध पथकाला आचल हिचा मृतदेह सायंकाळी धोरवासा (तेलवासा) शिवारात आढळून आला. पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि मच्छिमारांनी संयुक्तरित्या शोधकार्य केले. सदर घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.