जितेंद्र कोठारी, वणी: शहरात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने सुरू आहे. आधी रात्री घरासमोर ठेवलेली दुचाकी चोरीला जात असताना आता वरदळीच्या ठिकाणी भर दिवसा दुचाकीवर चोरटे डल्ला मारत आहे. वणीतील नांदेपेरा रोडवरून नुकतीच एक दुचाकी चोरीची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की अरविंद कुडमेथे (50) हे चिखलगाव येथील रहिवासी आहे. ते नांदेपेरा रोडवरील एका कपड्याच्या दुकानात काम करतात. त्यांनी 2014 साली पॅशन प्रो (MH-29 AP8467) ही दुचाकी खरेदी केली होती. ही गाडी ते त्यांच्या दुकानाच्या व इतर कामांसाठी वापरायचे. दिनांक 17 जानेवारी रोजी अरविंद हे नांदेपेरा रोडवरील मनिप्रभा टॉव्हर येथील दुकानात नेहमीप्रमाणे कामासाठी गेले होते. त्यांनी सकाळी दुकानासमोर गाडी लावली. काम संपल्यानंतर ते संध्या 5 वाजताच्या सुमारास दुकाना बाहेर आले असता त्यांना ठेवलेल्या ठिकाणी गाडी आढळून आली नाही.
दोन दिवस त्यांनी त्यांच्या दुचाकीचा शोध घेतला, मात्र त्यांना ती कुठेही आढळून आली नाही. अखेर त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे. शहरात आता भरदिवसा दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. सीसीटीव्हीची भीती देखील चोरट्यांना नसल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी तात्काळ प्रकरणाचा छडा लावावा अशी अपेक्षा वणीकर करताना दिसत आहे.