वणी शहरात “शुद्ध’ पाण्याचा ‘अशुद्ध” व्यवसाय

● फिल्टर न करता बोअरवेलचे पाणी थंड करून विक्री

0

जितेंद्र कोठारी, वणी: पिण्याच्या पाण्याचे दूषित पेयजल स्रोत व आरोग्याची काळजी म्हणून मागील काही वर्षात शहरी व ग्रामीण भागात ‘शुद्ध’ पाण्याची मागणी वाढली आहे. मागील काही वर्षांपासून वणी शहर व ग्रामीण परिसरात ‘मिनरल वॉटरच्या नावावर अशुध्द पाणी पुरविण्याचा गोरखधंदा जोरात आहे. व्यावसायिक स्पर्धेत टिकण्यासाठी आरओ प्रक्रिया न करता फक्त थंड केलेले पाणी विकून सर्वसामान्य जनतेची फसवणूक व आरोग्याशी खेळ करण्याचा प्रकार वणीत सर्रास सुरू आहे. लाखोंची उलाढाल असलेल्या या व्यवसायावर कुणाचाच अंकुश नाही. याशिवाय शहरात अनेक ठिकाणी राहत्या घरात मिनी फिल्टर प्लांट बसवून कोणतीही परवानगी शिवाय पाण्याच्या व्यवसाय केल्या जात आहे.

वणी नगर परिषद क्षेत्र व लगतच्या गणेशपूर, चिखलगाव, लालगुडा ग्राम पंचायत हद्दीत अंदाजे 20 ते 25 वॉटर फिल्टर प्लांट आहे. भारतीय मानक ब्युरोचे प्रमाणपत्र व अन्न सुरक्षा मानद कायद्यांतर्गत परवाना न घेता पाण्यावर प्रक्रिया करून त्याची जारमध्ये विक्री करण्याचे प्रताप हे व्यावसायिक करीत आहे. विहीर अथवा बोअरवेलचे पाणी “स्टोअर टॅंक’मध्ये पाठवितात. तेथून ते फिल्टर करतात. मात्र, हे फिल्टरसुद्धा केवळ नावालाच असते. त्यानंतर पाणी चिलिंग टॅंकमध्ये पाठविले जाते. तेथून थेट कॅनमध्ये साठवणूक करून ग्राहकांच्या माथी मारले जाते.

पूर्वी 15 लिटर थंड पाण्याचा जार 40 रुपये तर फक्त फिल्टर पाण्याची 20 लिटर क्षमतेच्या कॅनची 20 रुपये प्रमाणे विक्री केल्या जात होती. कमी भांडवलामध्ये अधिक नफा देणाऱ्या या व्यवसायात प्रतिस्पर्धी वाढल्याने आता 10 रु. जार प्रमाणे विक्री सुरू आहे.

पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भारतीय मानक ब्युरोचे प्रमाणपत्र आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना लागतो. मात्र, या दोन्ही विभागांची परवानगी न घेताच वणी शहरात मोठ्या प्रमाणावर थंड पाण्याची विक्री सुरू आहे.

टाटा एस (छोटा हत्ती) या मालवाहक वाहनात 1000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी ठेवून पाईपद्वारे पाणी विक्री करण्याचा फंडा शहरात सुरू आहे. शहरात दिवसभर गल्ली मोहल्यात फिरून विक्री होत असलेले पाणी शुद्ध आहे किंवा नाही याची साधी चौकशी नगर परिषद व आरोग्य विभागातर्फे केली जात नाही.

लग्न अथवा इतर प्रसंगात थंड पाण्याच्या कॅन दिसतात. थंड पाणी पाहून पाहुण्यांनाही समाधान वाटते. थंड केलेले शुध्द पाणी देणे आज एक प्रतिष्ठेचाही भाग झाला आहे. बाजारात असणारी भयंकर स्पर्धा व जास्त नफा मिळविण्याची वृत्ती यामुळे मिनरल वॉटरच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. साधारणत 20 रुपयांत 20 लिटर अशुध्द, दूषित पाण्याची कॅन मिळत आहे.

या कॅनमध्ये रिव्हर्स ऑसमॉसिस (आरओ) ही शुद्धीकरणाची प्रक्रिया केलेले शुध्द पाणी असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात अल्ट्राव्हायोलेट किरणांनी (युव्ही) हे पाणी अगदी कमी खर्चात फिल्टर केले जाते. पाणी निर्जंतूक व्हायचे असेल तर ते रिव्हर्स ऑसमॉसिस व अल्ट्राव्हॉयलेट प्रक्रियेतून जाययलाच हवे. पिण्यायोग्य पाण्यात क्षाराचे अर्थात टीडीएसचे प्रमाण 70 ते 80 पेक्षा जास्त नको. त्यापेक्षा जास्त टीडीएस असल्यास आरोग्याच्या गंभीर तक्रारी उद्भवू शकतात.

विक्री होणाऱ्या पाण्यात टीडीएसदेखील जादा असते. पाणी थंड असल्यास ग्राहकाला त्यातील टीडीएसची फारशी कल्पना येत नाही. थंड पाण्यामुळे पाण्याच्या चवीकडे दुर्लक्ष होते. लग्नसमारंंभात मिळणारे बहुतांश ठिकाणचे पाणी अशुद्ध असते. शुल्क मात्र शुद्ध पाण्याचे आकारले जाते.

कोरोनाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या बोगस पाणी फिल्टर प्लांटवर अन्न व औषध विभाग, नगर परिषद व आरोग्य विभागाने कायदेशीर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.