इमारतीवरून पडून बांधकाम कामगार तरुणाचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी : घराचा बांधकाम करताना 11 के.वी. वीज तारांचा शॉक लागून बांधकाम मिस्त्री तरुणाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला. झरी तालुक्यातील मुकुटबन येथे मंगळवारी दुपारी 2.30 वाजता ही दुःखद घटना घडली. राजेश सुधाकर रासमवार (31) रा. मुकुटबन असे मृत कामगाराचा नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार मुकुटबन येथील भारतीय स्टेट बँकेच्या बाजूला प्रकाश पोलशेट्टीवार यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. सदर कामावर मुकुटबन येथीलच राजेश रासमवार हा ठेकेदाराकडे मिस्त्री कामावर होता. मंगळवारी दुपारी घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बांधकाम सुरु असताना वरून जाणाऱ्या विद्युत वाहिनीच्या जीवंत ताराला राजेशचा स्पर्श झाला. यात राजेशला जोरदार धक्का बसून तो इमारतीवरून खाली कोसळला. 

अपघाताची माहिती मिळताच त्याला लगेच एका खाजगी वाहनाने वणी येथे आणले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. वणी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केेला. याबाबत वणी पोलिसांना माहिती देण्यात आली असून प्राथमिक चौकशी सुरु आहे. मृतक राजेशच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. घराचा कमावता व्यक्ती दुर्देवी घटनेत मृत पावल्याने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

हे ही वाचा –

विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Comments are closed.