वनोजा येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्या नसून हत्या झाल्याचा भावाचा आरोप

भास्कर राऊत, मारेगाव: वनोजादेवी येथील विवाहितेने आपल्या सासुरवाडी असलेल्या टिटवी येथे पतीच्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मात्र ही आत्महत्या नसून तिच्या सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप मृतक महिलेच्या भावाने केला आहे. याबाबत पारवा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे

सविस्तर वृत्त असे की, मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी येथील सुरेश शंकर बुच्चे यांच्या मुलीचा विवाह 2019 मध्ये घाटंजी तालुक्यातील टिटवी येथील सतीश वासुदेव गंडे,28 यांचेशी झाला. लग्नानंतरचे काही दिवस आनंदात गेले. यांच्या संसाररूपी वेलीवर एक फुलदेखील उमलले. आणि येथूनच त्यांच्या कुटुंबात कलह व्हायला सुरुवात झाली.

कारण सुवर्णाच्या भासऱ्याच्या लग्नाला चार वर्षे लोटूनही त्यांना मुलबाळ नव्हते. त्यामुळं आपले बाळ त्यांना देऊ असा प्रस्ताव सुवर्णाचा पती सतीश गंडे याने ठेवला. त्यास सुवर्णा हिने विरोध केल्याने त्यांचे घरी वाद वाढायला लागले. अशातच सुवर्णा ही 4 महिन्यापूर्वी माहेरी वनोजादेवी येथे आली. तिने आपल्या आईवडील तसेच भाऊ यांना आपबीती सांगितली. परंतु घरच्यांनी आज नाही तर उद्या तरी सुधरेल या आशेने आपल्या मुलीला काही दिवस शांत राहायला सांगितले. दरम्यान मुलगा दत्तक देण्यासाठी तीला तगादा लावण्यात यायचा. तर कधीकधी मारहाण सुद्धा व्हायची.

दि.7 जूनला रात्री 8.30 ला प्रमोद गंडे यांनी फोन करून करून सांगितले की, सुवर्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून माहेरची मंडळी रात्रीच टिटवी येथे पोहोचली. त्यावेळी सुवर्णा हिला खाली टाकलेले होते. दुसरे दिवशी सकाळी मृतक सुवर्णा हिचा भाऊ प्रवीण सुरेश बुच्चे यांनी पारवा पो. स्टे. ला तक्रार दाखल केली. यात सुवर्णा हिची आत्महत्या नसून हत्याच आहे. कारण सुवर्णा हिच्या पाठीवर खरचटल्याच्या खुणा आढळल्या. यावरून माझ्या बहिणीच्या मृत्यूस पती सतीश गंडे, भाऊ विशाल गंडे, जाऊ कविता गंडे, आणि सासू कुसुम गंडे हे सर्व कारणीभूत आहे अशा आरोप केला.

या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 304 b,306,498 a, 323, 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

हे देखील वाचा:

नुकतीच 12 वी पास झालेल्या लालगुडा येथील युवतीची आत्महत्या

ब्राह्मणी रोडवर भीषण अपघात, तरुण जागीच ठार

Comments are closed.