…आणि ईश्वरचिठ्ठीने झाला लढतीचा फैसला… वारे नगरपालिकेचे भाग 2

निवडणुकीत कोण ठरले भाग्यवान व कोण ठरले दुर्दैवी उमेदवार ?

जब्बार चीनी, वणी: येत्या 2-3 महिन्यात वणी नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे शहरात निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. वणी नगर पालिकेला 96 वर्षांचा इतिहास आहे. या कालावधीत घडलेले निवडणुकीचे विविध किस्से, रंजक राजकीय घडामोडी, डावपेच आम्ही आपल्यासमोर  ‘वारे नगरपालिकेचे’ या मालिकेद्वारा घेऊन आलो आहोत. आज दुस-या भागात आपण नगरपालिका निवडणुकीतील भाग्यवान आणि दुर्दैवी उमेदवारांबद्दल जाणून घेणार आहोत.

वारे नगर पालिकेचे भाग 2
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अत्यंत चुसशीची होते. यात एका एका मताला महत्त्व असते. केवळ एक मत अनेकांचे राजकीय करीअर घडवते तर कुणाचे संपवूनही टाकते. कधी समान मते भेटल्याने ईश्वर चिठ्ठीने देखील याचा फैसला करण्याची वेळ येते. वणीत देखील एका निवडणुकीत ईश्वर चिठ्ठीने निवडणुकीचा निकाल लागला आहे. त्याबद्दल आपण शेवटी बघणार आहोत.

1996 च्या निवडणुकीत 23 वार्ड होते. या निवडणुकीत सर्वाधिक चुरशीची निवडणूक वार्ड क्रमांक 3 मधील ठरली होती. या निवडणुकीत पहिल्यांदाच धनराज उर्फ राजू भोंगळे हे निवडणुकीला उभे राहिले होते. त्यांची गणपत अतकरे यांच्याविरोधात मुख्य लढत झाली. यात अपक्ष उमेदवार राजू भोंगळे यांना 282 मते मिळाली तर शहर विकास आघाडीचे गणपत अतकरे यांना 279 मते मिळाली. या लढतीत अवघ्या 3 मतांनी राजू भोंगळे यांचा विजय झाला होता.

2001 ला पहिल्यांदाच प्रभाग रचनेनुसार निवडणूक झाली. सोबतच पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक झाली. या निवडणुकीत 25 वार्डाचे 8 प्रभाग करण्यात आले होते. यात प्रभाग क्रमांक 2 (क) आणि प्रभाग क्रमांक 3 (अ) यात अत्यंत चुरशीची लढत झाली. प्रभाग क्रमांक 3 मध्ये पौर्णिमा शिरभाते या फक्त दोन मतांनी निवडूक आल्या होत्या. त्यावेळी पौर्णिमा शिरभाते यांना 699 मते मिळाली होती तर अनिता ताजणे यांना 697 मते मिळाली.

प्रभाग क्रमांक 2 (क) मध्येही अशीच चुरशीची निवडणूक पाहायला मिळाली. यात शेख चांद शेख जुम्मन यांनी धनराज उर्फ राजू भोंगळे यांचा अवघ्या 5 मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत शेख चांद शेख जुम्मन यांना 513 मते मिळाली तर धनराज भोंगळे यांना 508 मते मिळाली. ही एकमेव निवडणूक आहे ज्या निवडणुकीत राजू उर्फ धनराज भोंगळे यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी कधीही पराभवाचे तोंड बघितले नाही. या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येणाचा मान काँग्रेसच्या निर्मला प्रेमलवार यांना मिळाला. प्रभाग क्रमांक 4 (शास्त्रीनगर) या प्रभागात त्या 1101 मतांनी निवडून आल्या होत्या. त्यांना 1698 मते मिळाली होती. छायाताई निंदेकर यांना 597 मते मिळाली होती.

अलिकडच्या काळातील सर्वाधिक चुरशीची निवडणूक म्हणजे 2006 ची निवडणूक. याच निवडणुकीत एका वार्डात चक्क इश्वरचिठ्ठीने फैसला झाला, तर तीन जागी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. वार्ड क्रमांक 23 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे रविंद्र कांबळे आणि अपक्ष किशोर मून यांच्यात ‘काटे की टक्कर’ झाली. या निवडणुकीत किशोर मून यांना 216 तर रविंद्र कांबळे यांना 214 मते मिळाली. अवघ्या 2 मतांनी किशोर मून विजयी झाले होते.

अशीच चुरस वार्ड क्रमांक 22 मध्ये पाहायला मिळाली. इथे तिरंगी लढत झाली. यात काँग्रेसचे प्रमोद लोणारे यांना 229 मते मिळाली तर अपक्ष उमेदवार राजू डवरे यांना 225 मते मिळाली. तर दुसरे अपक्ष उमेदवार अभय नावडे यांना 219 मते मिळाली. या निवडणुकीत प्रमोद लोणारे यांनी अवघ्या 4 मतांनी राजू डवरे यांचा पराभव केला होता. तर अभव नावडे यांना अवघ्या 10 मतांनी पराभव पत्करावा लागला.

वार्ड क्रमांक 25 मध्ये शिवसेनेचे घनश्याम पडोळे आणि राष्ट्रवादीचे संजीव रंगुरवार यांच्यात चांगलीच लढत झाली. या निवडणुकीत घनश्याम पडोळे यांना 330 मते मिळाली तर राष्ट्रवादीचे रंजीव रंगूरवार यांना 326 मते मिळाली. अवघ्या 4 मतांनी पडोळे यांनी विजय मिळवला होता. या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान वार्ड क्रमांक 16 मध्ये राष्ट्रवादीचे यादव सातपुते यांना मिळाला. त्यांना 476 मते मिळाली होती. त्यांनी काँग्रेसचे बाळकृष्ण पारखी यांचा 284 मतांनी पराभव केला होता. निवडून आल्यानंतर यादव सातपुते हे नगराध्यक्षही झाले होते. 

….आणि ईश्वर चिठ्ठीने झाला फैसला
2006 ची निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेली लढत म्हणजे वार्ड क्रमांक 4 ची लढत. शिवसेनेच्या माधुरी देवराव काकडे व अपक्ष उमेदवार शाहीन बानो सय्यद सर्फराज यांच्यातील लढती चांगलीच रंगली. दोघींनाही प्रत्येकी 124 मते पडली. त्यामुळे अखेर इश्वरचिठ्ठीने निर्णय देण्याचा फैसला झाला. ईश्वर चिठ्ठी काढली असता यात माधुरी काकडे या भाग्यवान ठरल्या व त्या विजयी झाल्या. तर शाहीन बानो या दुर्दैवी उमेदवार ठरल्या.

नगरपालिकेचे किस्से, करामती, रंजक घडामोडी, राजकीय डावपेट इत्यादी घेऊन लवकरच येतोय. जर आपण वारे नगर पालिकेचा भाग 1 वाचला नसल्यास खाली भाग 1 ची लिंक दिली आहे. त्यावर क्लिक करून पहिला भाग आपण वाचू शकता.

वारे नगरपालिकेचे भाग 1: वणी नगर पालिकेला 96 वर्षांचा इतिहास

हे देखील वाचा:

वणीत होणार पहिल्यांदाच स्टॉक मार्केट प्रशिक्षण शिबिर

Comments are closed.