शिरपूर भागातील अवैध धंदे रोखणार कोण? अवैध दारुअड्याचे व्हिडीयोही व्हायरल

शिंदोला, चारगाव चौकीसह अनेक गावात अवैध दारुचे अड्डे

0

जितेंद्र कोठारी, वणी: जिल्ह्यातील अवैध धंद्याना थारा देणार नसल्याचे पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी सांगितले असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून वणी तालुक्यातील शिरपूर, कुरई, वेळाबाई, मोहदा, हनुमान नगर इत्यादी ठिकाणी राजरोसपणे मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. पोलिसांच्या आशीर्वादानेच गावोगावी अवैध दारू विक्री होत असल्याचे आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. गाव खेड्यात जागोजागी खुलेआम दारू मिळत असल्याने कामगार, तरुण व अल्पवयीन मुलंसुद्दा व्यसनाच्या आहारी जात असल्याचे चित्र परिसरात आहे. त्यामुळे शिरपूर भागातील अवैध दारूविक्री रोखणार कोण? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे. याबाबत शिंदोला आणि चारगाव येथील अवैध दारूविक्रीचा व्हिडीओ ‘वणी बहुगुणी’च्या हाती आला असून हे व्हिडीओ देखील सोशल मीडियात व्हायरल चांगलेच व्हायरल होत आहे. याआधी कायर येथील राजरोसपणे सुरू असलेल्या मटकाअड्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. 

सध्या शिरपूर पोलीस ठाणे अवैध धंद्याचे माहेरघर बनल्याचे दिसून येत आहे. राजरोसपणे चालणारा मटका, ट्रान्सपोर्टरची वसुली यानंतर आता परिसरातील अवैध दारूविक्री देखील समोर आली आहे. या दारूविक्री करणा-यांची परिसरात दहशत असल्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास स्थानिक नागरिक धजावत नाही. काही गावात तर चक्क महिला दारु विकत असल्याची माहिती आहे. या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई झाली तरी पुन्हा काही दिवसांनी हे अवैध धंदे सुरू होते.

शिंदोला व चारगाव चौकीवरील अवैध दारुविक्रीचा व्हिडीओ व्हायरल
व्हायरल झालेला एक व्हिडीओ हा शिदोल्याजवळील कळमना रोड येथील एका धाब्यावरचा आहे. यात धाब्यातील कर्मचारी खुलेआम दारू विक्री करताना दिसत आहे. या धाब्यावर 30 ते 40 टक्के अधिक रक्कम घेऊन दारूची अवैधरित्या विक्री होत आहे. तर दुसरा व्हिडीओ चारगाव चौकी येथील आहे. या व्हिडीओत एका धाब्यावर दारुची अवैधरित्या विक्री होत आहे. या ठिकाणी तर दारूसाठी ग्राहकांकडून 50 ते 60 टक्के (दीडपट) पेक्षा अधिक रक्कम आकारली जाते. परिसरातील अवैध धंदे बंद असल्याचा दावा होत असताना असे शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत चालणारे अनेक अवैध धंदे उघड होत आहे.

अवैध दारुविक्रेत्यांना खाकीचे अभय?
अशा काही धंद्याना खाकी वर्दीचे अभय असल्याचे परिसरातील ग्रामस्थांकडून बोलले जाते. विशेष म्हणेज दारुच्याधंद्यावर धाड पडायची असल्यास त्याची माहिती आधीच अवैध धंदेवाल्यांना कशी मिळते? याविषयी आश्‍चर्य व्यक्त होत आहे. लॉकडाऊनच्या काळात थंडावलेला अवैध दारू विक्री व्यवसाय आता पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला आहे. अवैध दारू विक्री व्यवसायिक आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. याकडे कोणतेही लक्ष दिले जात नाही. तर दहशतीमुळे तक्रारही करता येत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहे.

राजरोसपणे चालणा-या या दारुविक्रीमुळे राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. सातत्याने व्हि़डीओ व्हायरल होऊनही कुणाला कोणतीही कायद्याची भीती नसल्याने ‘सब चंगा सी’ असल्याचे दिसून येते. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देऊन शिरपूर भागात अवैध दारु विक्रीसह सर्व अवैध बंद करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.

दारू अड्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ…

हे देखील वाचा:

शिरपूर पोलिसांच्या डोळयावर मटका ‘पट्टी’

Leave A Reply

Your email address will not be published.