विजय चोरडिया शिंदेसेनेत दाखल, स्थानिक राजकारणात खळबळ
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मिळणार पक्षाला उभारी
बहुगुणी डेस्क, वणी : वणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांनी अखेर भाजपला रामराम केला असून, मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत अधिकृत प्रवेश घेतला. या प्रवेशामुळे वणीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरत असून, आता शिंदेसेना चोरडियांना कोणती जबाबदारी सोपवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा प्रवेश वणी भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबईत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोरडियांचे शिंदेसेनेत स्वागत केले. यावेळी राज्याचे पालकमंत्री संजय राठोड तसेच माजी आमदार व शिंदे गटाचे नेते विश्वास नांदेकर उपस्थित होते. विशेष म्हणजे, या प्रवेश प्रक्रियेत नांदेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समजते.

मागील विधानसभा निवडणुकीत विजय चोरडिया यांनी भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, तिकीट न मिळाल्याने ते पक्षापासून दूर गेले होते. अखेर त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत भाजपला रामराम ठोकला आणि शिंदेसेनेत प्रवेश करून राजकीय समीकरणात नवे वळण आणले आहे.


Comments are closed.