जितेंद्र कोठारी, वणी: मुळचे वणीचे रहिवासी असलेले व सध्या गोंदिया येथे पोलीस विभागात कार्यरत विजय मानकर (35) यांचा आज पहाटे गोंदिया शहराजवळील ढिमर टोली येथे भीषण अपघात झाला. कारवाई करून ते परतत असताना त्याच्या व्हॅनची उभ्या ट्रकला धडक बसली. या अपघातत ते जागीच ठार झाले तर त्यांच्या सोबतचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले.
मंगळवारी दिनांक 6 डिसेंबरच्या रात्री स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पथक हे कर्तव्य बजावण्यासाठी निघाले होते. कारवाई करून हे पथक पहाटेच्या सुमारास गोंदिया येथे मुख्यालयात परतत होते. मात्र पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास गोंदियाजवळील ढिमर टोली या गावाजवळ त्यांच्या भरधाव व्हॅनची एका उभ्या ट्रकला मागून धडक बसली. या अपघातात विजय मानकर यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे दोन सहकारी गंभीर जखमी झाले.
ही धडक इतकी जबर होती की यात पोलीस वाहनाचा चेंदामेंदा झाला. रात्रभर कारवाई करून परतत असताना चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले. मात्र यातील एका जखमी कर्मचा-याचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.
विजय मानकर हे वणीतील छोरीया ले आऊट येथील रहिवासी होते. 2010 पासून ते गोंदिया जिल्हयातील पोलीस विभागात कार्यरत होते. सध्या त्यांची पोस्टींग स्थानिक गुन्हे शाखा येथे होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आई वडिल असा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर वणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.