कायर येथे सुरू होणा-या दारू दुकानास गावकऱ्यांचा विरोध
खासदार बाळू धानोरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कायर येथे नव्याने सुरू होत असलेल्या देशी दारू दुकानाला गावकऱ्यांनी विरोध केला आहे. यात सरपंच, सचिव, अनुमोदन यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी दारू दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावक-यांनी या विषयीची तक्रार खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे केली आहे. खासदारांनी ही तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे दिली आहे.
कायर येथे अशोक गजानन निमसटकर व भीमराव वारलू गुरनुले यांनी सरपंच, सचिव यांना हाताशी धरून व देशी दारूचे दुकान स्थानांतरणाबाबत ग्रामसभेचा बनावट ठराव घेतला व कायर येथे दारू दुकान लावण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. 20 मार्च रोजी प्रस्थावीत ग्रामसभेची नोटीस 10 मार्च रोजी प्रसिद्ध केल्याचे ग्रामपंचायत च्या रेकार्डवर नोंद आहे.
ग्रामसभेच्या नोटीस संदर्भात ग्रामस्थांना कोणतीही पूर्वसूचना न देता सभा घेण्यात आली व या ग्रामसभेत उपस्थित असलेल्या महिलांची स्वाक्षऱ्या महिला बचत गटाच्या नावाखाली घेण्यात आल्या. या सर्व व्यवहारात सरपंच, सचिव, सूचक व अनुमोदक यांनी पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
कार्यपालकाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत क्षेत्रात मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्याच्या परवानगी पूर्वी ग्रामस्थांना सदर विषय समजावून सांगणे आवश्यक आहे. परंतु या आदेशालाही केराची टोपली दाखवित ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले असा आरोप करण्यात आला आहे. या सर्व व्यवहारात सरपंच, सचिव, सूचक व अनुमोदक यांनी स्वतःचा स्वार्थ साधला आहे. याबाबत परवानगी दिल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा गावक-यांनी दिला आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)