मेंढोली जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य

वाहनचालकांना अपघाताचा धोका, माकपचे निवेदन

0

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी येथून 17 ते 20 किमी अंतरावर जंगलाच्या आडोशाला असलेल्या मेंढोली या गावात जाण्यासाठी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. करिता येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शाखेने आमदार, खासदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंत्यांना रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी सोमवारी दिनांक 26 ऑक्टोबर रोजी निवेदनातून मागणी केली. रस्त्याचे बांधकाम न केल्यास रास्ता रोको व घेराव घालण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

मेंढोली गावाला जाण्यासाठी घोंसा रस्त्यावर 18 नंबर पुलमार्गे 17 किमी व शिरपूर मार्गे 20 किमी अंतर कापत जावे लागते. गेल्या 5 वर्षांपूर्वी हे दोन्ही रस्ते बांधण्यात आले. रस्ता बांधकाम सुरू असतानाच रस्त्याचे निकृष्ट बांधकाम करण्यात येत आहे अशी गावकऱ्यांनी तक्रार होती. मात्र तसे असतानाही त्याची कोणतीही चौकशी करण्यात आली नाही, परिणामी हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनला असून संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले आहेत, रस्त्याचे डांबर गायब होऊन गिट्टी वर आलेली आहे.

दुर्दशा झालेल्या ह्या रस्त्यामुळे येथील नागरिकांना वाहन चालविणे कठीण असून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, इतकेच नाहीतर ह्या निकृष्ट बांधकाम झालेल्या रस्त्यामुळे कित्येक अपघात होऊन कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

रस्त्याचे ताबडतोब बांधकाम करण्यात यावे अन्यथा रास्ता रोको व नंतर घेराव आंदोलन करण्याचा इशारा आमदार, खासदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून कॉ मनोज काळे, कीर्तन कुलमेथे, संजय वालकोंडे, रवी उपासे व अन्य गावकऱ्यांनी दिला आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.