वणीतील कार्यकर्त्याची यवतमाळमध्ये अधिका-याला मारहाण
11वीच्या प्रवेशासाठी वंचित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्याला मारहाण
रवि ढुमणे, वणी: अकारावीच्या प्रवेशाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यासाठी ‘लढा शिक्षणाचा विदार्थ्यांच्या हक्काचा’ या कॅम्पेनचे स्वप्नील धुर्वे यांनी थेट शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याला यवतमाळमध्ये गाठून चक्क मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. यावेळी चिंतामन वंजारी त्यांच्या चेह-यावर शाईसुद्धा फेकण्यात आली. त्यांना वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. या प्रकरणी स्वप्निल धुर्वे आणि त्याच्या सहकाऱ्यावर गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे. यवतमाळ अँग्लो हिंदी हायस्कुलच्या प्रांगणातील ही घटना आहे. या मारहाणीचा व्हिडीओ ‘वणी बहुगुणी’च्या हाती आला आहे.
अकरावीच्या विद्यार्थांना प्रवेश मिळावा यासाठी ‘लढा शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या कॅम्पेनद्वारे आंदोलन छेडण्यात आले होते. उपोषणादरम्यान स्थानिक आमदार व वरोरा भद्रावती चे आमदार बाळू धानोरकर यांनी शिक्षण विभागाचे उपसंचालक यांचेशी चर्चा करून प्रवेश सर्वांना मिळणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र आमदारांनी मध्यस्थी करीत प्रवेश मिळणार असे आश्वासन देऊन देखील शिक्षण विभागाने चुप्पीच साधली. विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचितच राहावे लागले.
उपसंचालक अमरावती विभागाने एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेत कारवाई करण्याचे पत्र माध्यमिक शिक्षण विभागाला दिले होते. मात्र येथील अधिकारी लोकप्रतिनिधीच्या दबावात काम करीत असल्याचा संशय ‘लढा शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या कॅम्पेच्या स्वप्निल धुर्वे यांना आला. धुर्वे यांनी शिक्षण विभागातील अधिकारी चिंतामण वंजारी यांना यवतमाळ येथील अँग्लो हिंदी हायस्कुलच्या प्रांगणात गाठले. तिथं त्यांची प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली. मात्र चर्चा करीत असतानाच स्वप्निल धुर्वे यांचा संयम सुटला आणि त्यांनी अधिकाऱ्याला मारहाण केली. अशी तक्रार चिंतामण गुलाब वंजारी यांनी वडगाव पोलीस ठाण्यात जाऊन दिली.
त्यावरून स्वप्नील किर्तीमंतराव धुर्वे आणि सहकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात संबंधितांवर भादवी 353/332/427/34 नुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. सध्यातरी तक्रारकर्ते अधिकारी वडगाव ठाण्यातच असल्याची माहिती आहे. सोबतच ठाण्याच्या बाहेर अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात एकत्र आले आहे.
(आपल्या जवळ असणा-या न्यूज किंवा पब्लिश झालेल्या न्यूज संबंधी संपर्क साधू शकता, निकेश जिलठे- संपादक, वणी बहुगुणी 9096133400 )
खाली क्लिक करून मारहाणीचा संपूर्ण व्हिडीओ पाहा….