वणीत बँड कलाकारांचे आंदोलन, आर्थिक मदतीची मागणी
"मी बँड कलाकार - मी बेरोजगार" पाट्या घेऊन आंदोलन
जितेंद्र कोठारी, वणी: कुठल्याही समारंभात वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांना मोठी मागणी असते. लग्नसराईत तर या कलाकारांच्या तारखा मिळणे मोठे मुश्किल असते. परंतू मागील तीन महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे या शेकडो वादक कलाकारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. बँद वादक कलाकारांना आर्थिक मदत करा यासाठी शुक्रवारी वणीत आंदोलन करण्यात आले. कमानी जवळील दुकानासमोर बँक पथम मालक व कर्मचा-यांनी आंदोलन करत वादनासाठी परवानगी देण्याची व आर्थिक मदत करण्याची मागणी केली. यावेळी “मी बँड कलाकार – मी बेरोजगार” अश्या पाट्या घेऊन आंदोलन करण्यात आले.
लग्नसमारंभात, निवडणुकीच्या जंगी मिरवणुकीत, छोट्या मोठ्या घरगुती समारंभापासून प्रत्येक ठिकाणी बँड वाजवणाऱ्या कलाकारांची आवश्यकता असते. लग्न समारंभामध्ये वऱ्हाडी मंडळींचा जोश वाढवण्याचे काम हे कलाकार करतात. काही हजारांपासून अगदी लाखो रुपयांपर्यंत या कलाकारांची बिदागी असते. वर्षातील काही दिवसच यांना रोजगार उपलब्ध असतो. या काही दिवसांच्या रोजगारावरच या कलाकारांना आपले कुटुंब वर्षभर चालवावे लागते.
लॉकडाउनमुळे एका छोट्या बँड पथकाचे साडेचार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एका पथकात दहा ते बारा कलाकार असतात. या कलाकारांना वर्षाकाठी चाळीस ते साठ हजार रुपये मानधन आपली कला दाखवण्यासाठी मिळते. परंतु या वर्षी ऐन लग्नसराईच्या काळात लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे कुठलेही काम मिळाले नाही. किंबहुना या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लग्नसमारंभ, सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्यामुळे या बँड कलाकारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे
जीवन भर आपल्या सोबत सुख दु:खाच्या प्रसंगात साथ देणारा ‘बारा बलुतेदार” पैकी बँड कलाकार हा नेहमी उपेक्षित राहिला आहे. त्यामुळे शासनाने शहरी व ग्रामीण भागातील बँड कलाकार, झाडू, टोपल्या, बांबूचे साहित्य तयार करणारे तथा इतर बारा बलुतेदारांना प्रत्येकी 15 हजार रुपयांची तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी लहुशक्ती संघटनाद्वारे करण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून वणीतही हे आंदोलन करण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेत नेता प्रतीपक्ष देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व विधान परिषद नेता प्रतीपक्ष प्रवीण दरेकर यांना प्रशासनामार्फत निवेदन पाठवून आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे.