बहुगुणी डेस्क, वणी: एकीकडे प्रेमी जोडपे गिफ्ट, बुके देऊन व्हॅलेन्टाईन डे सेलिब्रेट करीत असताना दुसरीकडे मात्र लिव्ह इन मध्ये राहणा-या कपलच्या प्रेमकहाणीने हिंसक वळण घेतले ! त्यांच्यातील वाद इतका चिघळला की प्रेयसीने थेट प्रियकरावर चाकू उगारला. पैशाच्या मागणीवरून सुरू झालेला वाद धमक्या, CCTV फोडणे आणि अखेर चाकू हल्ल्या पर्यंत पोहोचला. वणीतील हिराणी ले आऊटमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रेमीयुगलामध्ये खासकरून लिव्ह इन मध्ये राहणा-या जोडप्यांमध्ये चागंलीच खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी विनोद (52), रा. हिराणी ले-आऊट, लालगुडा, वणी येथील रहिवासी आहे. ते मागील 8 वर्षांपासून राणी (35) नामक एका महिलेशी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. मात्र गेल्या काही काळापासून राणी ही पैशाची मागणी करीत वाद घालायची. त्यामुळे त्यांच्यातील वाद वाढत होते. 14 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास विनोद हे बाहेरून जेवण करून घरी परतले.
त्यावेळी घरी राणीने “आता तुझ्यासोबत राहायचं नाही. मला घर विकून पैसे दे” अशी मागणी केली. पैसे न दिल्यास तिची तुरुंगात ओळख झालेल्या एका मैत्रिणीला बोलवून घरी ठेवते. तसेच यवतमाळ येथील नामचिन महिला गुंड गुड्डी हिच्या गुंडांना बोलावून तुला मारून टाकू, अशी धमकी दिली. मात्र विनोदने तुझ्या धमकीला मी घाबरत नाही, कुणाला बोलवायचे ते बोलव असे प्रतित्तर दिले.
यामुळे वाद अधिक चिघळला. राणी तातडीने किचनमध्ये गेली व तिने चाकू आणत घरातील हॉलमधील CCTV कॅमेरा फोडला. त्यानंतर ती चाकू घेऊन विनोद यांच्या अंगावर धावली. दोघांमध्ये झटापट सुरू असताना चाकू विनोद यांच्या दंडावर लागला. यात त्यांना गंभीर इजा झाली.
विनोद यांनी थेट वणी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगत तक्रार दाखल केली. पोलिसांनी राणी हिच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम 118(1), 351(2), 351(3) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे हिराणी ले-आऊट परिसरात खळबळ उडाली असून, लिव्ह-इन रिलेशनशिपमधील आर्थिक वाद हिंसक वळण घेत असल्याची गंभीर बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.


Comments are closed.