मतदार यादीत सावळा गोंधळ, 236 तक्रारी प्राप्त

आक्षेप नोंदवण्यासाठी आणखी 4 दिवस, मनसेचे निवेदन

बहुगुणी डेस्क, वणी :नगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. मतदार एका प्रभागात वास्तव्यास असताना त्याचे नाव दुसऱ्या प्रभागाच्या यादीत आल्याचे अनेक उदाहरणे उघड झाली आहेत. या प्रकरणी मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी पत्रकार परिषद घेत प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला होता.

सोमवारी प्रारूप मतदार यादीवरील आक्षेप नोंदवण्याची शेवटची तारीख होती. आतापर्यंत दिवशी नागरिकांकडून तब्बल 236 आक्षेप नोंदवण्यात आले. मतदार यादीतील झालेला गोंधळ दूर करण्यासाठी मनसेनेही नगरपालिकेकडे निवेदन सादर केले. दरम्यान, संध्याकाळी राज्य निवडणूक आयोगाने एक पत्र जारी करत आक्षेप आणि हरकती नोंदवण्याची मुदत आणखी चार दिवसांनी वाढवली असून आता नागरिकांना 17 ऑक्टोबरपर्यंत आक्षेप घेता येणार आहेत.

या गोंधळामागे नेमके कारण काय?
निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून बीएलओ म्हणजेच बुथ लेव्हल ऑफिसर यांची नियुक्ती केली जाते. यामध्ये शिक्षक, सेवानिवृत्त अधिकारी, आशा वर्कर आदींचा समावेश असतो. यावेळी नवीन बीएलओंची नियुक्ती करण्यात आली असून, कामाचा अनुभव नसल्याने आणि काही ठिकाणी उदासीनता दाखवल्याने हा घोळ झाल्याचे बोलले जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मतदार आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असल्याने तो फक्त मतदानाच्या दिवशी बाहेर पडतो. यादी तपासण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांच्या नावांमध्ये चुकीचा समावेश झाला. बुथ प्रमुखांकडून जनजागृती केली जात असली तरी यावेळी तीही मर्यादित राहिल्याचे चित्र दिसते.

या प्रकरणी मनसेकडून शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. आक्षेप नोंदवण्याच्या तारखेला मुदतवाढ द्यावी, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी किंवा बीएलओंनी घरोघरी जाऊन मतदार यादी तपासावी आणि प्रत्येक वार्डात जनजागृती अभियान राबवावे, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

निवेदन देताना क्रिष्णा निमसटकर, शंकर पिंपळकार, अहमद रंगरेज, योगेश ताडम, सतीश ठोंबरे, सुजल तिवारी, साहिल येरणे, प्रवीण बोथरा, श्रेयस वरारकर आणि स्वयम ठाकरे उपस्थित होते.

Comments are closed.