वणीचा ‘हा’ लढवय्या समाजसेवक निवडणुकीच्या रिंगणाबाहेर !

नगरपालिका ते लोकसभा असा राहिला प्रवास

0 1,554

विलास ताजने, वणी:  वणी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात निवडणुकीचे वारे घोंगावू लागले. निवडणूक म्हटले की, तुम्हां – आम्हां सर्वांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असतोच. काही लोक समाजसेवेला प्राधान्य देत राजकीय कार्यात उडी मारतात. मात्र त्यांची गरुडझेप कुठंतरी कमी पडतंय. काहीसा असाच वणी बहुगुणी म्हणून अख्खा विदर्भात ओळखल्या जाणाऱ्या वणी शहराचा एक लढवय्या समाजसेवक आज निवडणुकीच्या रिंगणाबाहेर आहे. भलेही राजकीय क्षेत्रात उंच भरारी मारण्यात ते अपयशी ठरले असेलही, पण समाजकार्य करता करता अनेकांची मने तात्पुरती नव्हे तर कायमस्वरूपी जिंकण्यात त्यांना निश्चितच यश आलं आहे. एवढं मात्र खरं !

असं तुम्हा – आम्हा सर्वांच्या परिचयाच व्यक्तिमत्त्व म्हणजेच “नारायणराव शाहुजी गोडे”. तसं यांच मुळगाव झरी तालुक्यातील कोसारा. शेती हा मूळ व्यवसाय. बालपणीचे दिवस अत्यंत गरिबीचे. प्राथमिक शिक्षण अर्ध्यावरच सोडलेलं. अशा नारायणरावांनी एक नव्हे तर अनेक निवडणुका लढविल्या. त्यात नगरपरिषद ते लोकसभा असा त्यांचा प्रवास राहिला. मात्र एकाही निवडणुकीत विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडली नाही. हे त्यांचं नव्हे तर तुम्हां – आम्हां सर्वांच दुर्दैव म्हणावं लागेल. नारायणरावांनी समाजकार्यात स्वतःला झोकून दिलं. राजकीय स्वार्थासाठी ही समाजसेवा निश्चितच नव्हती.

त्यांनी सर्वप्रथम वणी नगरपालिका निवडणूक वार्ड क्र. १ मधून लढविली. यात त्यांचे प्रतिस्पर्धी होते आजचे विधानसभा अपक्ष उमेदवार संजय देरकर. या चुरशीच्या सामन्यात नारायणरावांचा निसटता पराभव झाला. संजय देरकर विजयी झाले. अन योगायोगाने त्यावेळी संजय देरकर नगराध्यक्ष बनले. परंतु तेंव्हापासून नारायणरावांनी मागे वळून पाहिलं नाही. वणी विधानसभेच्या १९९५ च्या निवडणुकीत गोडे यांना १४१ मते मिळाली. २००० ला ४५८, २००४ ला ६८२, २००९ ला ११७० तर २०१४ च्या निवडणुकीत ८३९ मते मिळाली होती. विशेष म्हणजे गोडे यांनी २००९ ची चंद्रपूर लोकसभेची निवडणूक लढविली. या सर्व निवडणुकांत भलेही त्यांचा पराभव झाला असेल. मात्र प्रत्येक निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेत राहिली. मात्र यावेळी त्यांनी नामांकन दाखल केले नाही. त्यामुळे अनेकांच्या ओठावर नारायणराव गोडे हे नाव निश्चितच आल्याशिवाय राहिलं नाही.

नारायणराव म्हणतात ‘मी लोकांसाठी धावून जातो. मला बघायचे आहे की, लोक मला किती चाहतात’. एकूणच राजकारण्यांच्या ढोंगी समाजसेवेला लोक सलाम करतात. पण समाजसेवकाच्या प्रामाणिक राजकारणाला लोक धुडकावून लावतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नारायणभाऊ. त्यांनी मध्यंतरी शिवसेना आणि काँग्रेस पक्षात काम केले. तत्कालिन आमदार वामनराव कासावार यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयाची जबाबदारीही दिली होती. मात्र ‘वन मॅन शो’ असलेले नारायणराव पक्षाच्या राजकारणात काही रमले नाही. 2014 च्या निवडणुकीआधी त्यांनी थेट लोकसभेसाठी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारीसाठी प्रयत्न केले व तिकिट न मिळाल्याने त्यांनी पक्ष सोडला. यावेळीही ते वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रयत्नशिल होते. 

मानवी जीवन जगत असतांना समाजाच आपल्यालाही काही देणं असतं याच भान न ठेवता नीतिमूल्ये तुडवित जीवन जगणाऱ्यांची संख्या अमाप आहे. मात्र अशा विपरीत परिस्थितीतही एखाद्याला समाजसेवेन झपाटलेलं असत. ज्यांना अशा समाजसेवकांच्या कार्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो त्यांच्या मनाच्या पटलावर अशा निःस्वार्थी सेवा देणाऱ्या समाजसेवकांच्या कार्याची आठवण कायमस्वरूपी कोरली जाते एवढं मात्र निश्चित !

Comments
Loading...