नांदेकरांना हेलिकॉप्टर, देरकरांना ट्रॅक्टर तर कातकडेंना बादली

दिग्गज अपक्षांनी माघार न घेतल्याने निवडणुकीची वाढली रंगत

0

वि. मा. ताजने, वणी: वणी विधानसभा निवडणुकीकरिता जवळपास तीस पेक्षा अधिक उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. यापैकी अपक्ष तीन दिग्गज उमेदवारांपैकी कोण आपला अर्ज मागे घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र या दिग्गजांपैकी कुणीही नामांकन अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे अनेकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. तर अपक्ष उमेदवार सुधाकर चांदेकर या एक उमेदवाराने माघार घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात एकूण 19 उमेदवार आपले नशीब अजमावणार आहे. वणी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्या स्वाक्षरीने उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे.

कुणाला कोणते मिळाले बोधचिन्ह?

राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्ष भाकपचे अनील घाटे यांना विळा कणिस, मनसेचे राजू उंबरकर यांना रेल्वे इंजिन, भाराकाँचे वामनराव कासावार यांना हात, भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार कमळ, बसपाचे संतोष भादिकर हत्ती, नोंदणीकृत राजकीय पक्ष संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे शिलाई मशिन, रिपाई (खोब्रागडे) चे गोपाल चौधरी ऑटोरिक्षा, वंबआचे डॉ. महेंद्र लोढा गॅस सिलिंडर, गोंगपाचे विकास कुडमेथे करवत, बमुपाचे विवेक खोब्रागडे खाट, बळीराजा पार्टीच्या संगीता खटोड यांना ताट तर अपक्ष विश्वास नांदेकर यांना हेलिकॉप्टर, संजय देरकर यांना ट्रॅक्टर, सुनील कातकडे यांना बादली, गीत घोष यांना एअर कंडिशनर, मृत्युंजय मोरे टेलिव्हिजन, केतन पारखी टायर, योगेश मडावी शिटी, चेतन आगलावे कपबशी यांचा समावेश आहे.

निवडणुकीची रंगत वाढली

नामांकन अर्ज कोण मागे घेणार याबाबत तर्क वितर्क लावले जात होते. मतदारात याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तीन दिग्गज अपक्ष उमेदवारांपैकी दोन अर्ज सारासार विचार करता निश्चितच मागे घेतले जातील अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र समाजातील वरीष्ठ नेत्यांनी मनधरणी करूनही कुणीही अर्ज मागे घेण्याची तत्परता दाखवली नाही. त्यामुळे तीन दिग्गज अपक्ष उमेदवारांमधून एकच उमेदवार रिंगणात उतरवून विजयी करण्याच्या मनसुब्यावर सध्यातरी पाणी फेरले आहे. दिग्गज उमेदवारांच्या गर्दीने निवडणुकीची रंगत आणखीनच वाढली आहे. आता विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडू शकते याविषयी कट्टयावर चर्चा रंगत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.