धक्कादायक ! वणीत ‘या’ ठिकाणी तब्बल 10 महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद
विवेक तोटेवार, वणी: शहरातील झिलपीलवार ले आऊट व स्नेहनगर येथील पाणीपुरवठा तब्बल 10 महिन्यापासून बंद आहे. या समस्येबाबत परिसरातील नागरिकांनी वारंवार प्रशासनाला निवेदन दिले. मात्र त्यांच्या मागणीकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. त्यातच नगर परिषदेकडून पाणीकरात वाढ करण्यात आली. पाणीच येत नसल्याने आम्ही पाणीकर का भरावा? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. वारंवार स्थानिक पातळीवर पाणी समस्येबाबत दुर्लक्ष झाल्याने आता परिसरातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत पाणी समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.
वणी शहराच्या दक्षिनेस टोकावर चौपाटी रेस्टॉरन्ट जवळ झिलपीलवार ले आऊट व स्नेहनगर आहे. गेल्या 10 वर्षांपासून इथे लोकवस्ती आहे. आधी हा परिसर लालगुडा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत होता. मात्र दोन वर्षांपूर्वी हा परिसर वणी नगर पालिकेत समाविष्ट करण्यात आला. नगर पालिकेने या परिसरात पाईप लाईन टाकली. काही दिवस या परिसरात पाणी पुरवठा सुरळीत होता. मात्र गेल्या 10 महिन्यापूर्वी या परिसरातील पाणी पुरवठा अचानक बंद झाला. त्यामुळे रहिवाशांचे चांगलेच हाल व्हायला सुरुवात झाली.
परिसरातील नागरिकांनी 15 जुलै 2022 मुख्याधिकारी यांना पाणी समस्येबाबत निवेदन दिले. मात्र पाणी समस्या काही सुटली नाही. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर मार्च 2023 ला मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मात्र समस्या जैसे थे होती. अखेर 15 मे रोजी पुन्हा परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
सध्या विहिरीतून पाणी पुरवठा
गेल्या 10 महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने परिसरातील नागरिकांनी वर्गणी गोळा करीत परिसरातील एका विहिरीला मोटार लावून पाणी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र विहीरीतून पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. सध्या उन्हाळा असल्याने पाणी समस्या आणखी भीषण झाली. त्यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.
का उद्भवली पाणी समस्या?
झिलपीलवार ले आऊट व स्नेहनगर या परिसराचा वणी नगर पालिका हद्दीत समावेश केल्यानंतर या परिसरात नगर पालिकेने पाईपलाईन टाकली. मात्र या पाईपलाईनकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. अनेकदा ही पाईप लाईन फुटली. शिवाय हा परिसर वणीचे टोक आहे. अनेक लोक मोटार लावून पाणी भरतात. त्यामुळे या परिसरापर्यंत पाणी पोहचत नसल्याचेही बोलले जाते. परिणामी परिसरात पाणी समस्या उद्भवली आहे. नगर परिषदेकडून पाणी मिळताच नसेल तर पाणी कर का भरावा? असा सवाल आता परिसरातील नागरिक करीत आहे. जर समस्या सोडवण्यात आली नाही तर महिलांतर्फे घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, आमदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन परिसरातील नागरिकांनी पाणी समस्या सोडवण्याची मागणी केली आहे. निवेदनावर वैभव बंडू नरुले, असिफ खान, भास्कर उमरे, महेश गोडे, उदय बोथरा, प्रदीप ढवळे, उत्तम चौलमवार, गोविंदा निवलकर, सुंदरलाल कश्यप, मधुकर जेणेकर, नामीम शेख,चिंटू बोथरा, प्रदीप चौधरी, ललिता पारोदे, सारिका पारोदे, किसन उईके संतोष मत्ते, गुणवंत गौरकार यांच्या स्वाक्षरी आहे.
Comments are closed.