लोकांना दिसतये मात्र अधिकारी आणि लोक प्रतिनिधींच्या डोळ्यावर पट्टी !
जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील नागरिक सध्या विविध समस्यांनी त्रस्त आहेत. रस्त्यांची दुरवस्था, अनियमित पाणी पुरवठा, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, अतिक्रमण, वाहतुकीचा बोजवारा, वाहन पार्किंगची समस्या, खासगी शाळांची मनमानी इत्यादी विविध प्रश्नांनी नागरिक हैराण झाले आहे. पावसाळा आल्याने सध्या या समस्या अधिक गंभीर झाल्या आहे. याबाबत एकमेकांशी चर्चा करून, सोशल मीडियातून याला वाचा फोडत आहे. मात्र लोक प्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे जे लोकांना दिसतेय ते अधिकारी आणि लोक प्रतिनिधींना दिसत नाही का ? असा संतप्त सवाल शहरातील सामान्य नागरिक उपस्थित करीत आहे.

वणी शहरात सिमेंट रस्ते, भूमिगत ड्रेनेज सिस्टिम, बगीचे, स्वच्छ पाणी पुरवठा या कामांसाठी मागील पंचवार्षिकमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला. केंद्रीय रस्ता निधी, विशेष निधी, दलित वस्ती सुधार निधी, खनिज विकास निधी व आमदार फंडातून केलेल्या या कामांचा मोठा गाजावाजा ही करण्यात आला. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे एका वर्षात सिमेंट रस्त्यांची व अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टिमची पुरती वाट लागली आहे.
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते…
टिळक चौक ते सरोदय चौक, जत्रा मैदान रोड, साई मंदिर ते नांदेपेरा रोड, नांदेपेरा रोड ते विठ्ठलवाडी डीपी रोड या रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय व न्यायालयात जाणाऱ्या रस्त्याची अवस्था मागील 2 वर्षापासून अतिशय वाईट असताना या रस्त्यावरून दररोज ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील अंतर्गत सिमेंट रस्त्यांवर एका पावसात जागोजागी खड्डे पडले आहे. दोष दायित्व कालावधीत असताना संबंधित ठेकेदारांना रस्त्याची सुधारणा करण्याची नोटीस संबंधित विभागाच्या वतीने का दिली जात नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
नगर परिषद कडून भूमिगत ड्रेनेजच्या कामावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यांवर पाण्याचे तळे साचले आहे. ड्रेनेज जागोजागी बंद पडून सांडपाणी रस्त्यांवर वाहत आहे. आमदार फंडातून काही रस्त्यांची निविदा मंजूर होऊन 3 महिने झाले. मात्र 25 ते 30 टक्के कमी दराच्या या कामांचे अद्याप वर्क ऑर्डर झाले नाही. शहरातील नागरिकांना पिण्याचा स्वच्छ पाणी मिळावं याकरिता वर्धा नदीतून पाणी पुरवठा योजनेवर करोडो रुपये खर्च करण्यात आले आहे. मात्र नागरिकांवर गढूळ पाणी पिण्याशिवाय पर्याय नाही. पाऊस काळात शहरात वीज पुरवठा खंडित होणे हे नित्याचेच झाले आहे. शहरातील पथदिवे दिवसा सुरु आणि रात्री बंद अशी परिस्थिती आहे. याशिवाय वणीतील सार्वजनिक ठिकाण हे डम्पिंग ग्राउंड झाले आहे. हा कचरा उचलल्या जात नसल्याने हा कचरा तिथेच पडून राहत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने याने रोगराई पसरण्याची भीती वाढली आहे.
शहरात वाहन पार्किंग ही एक मोठी समस्या नव्याने उद्भवत आहे. अनेक राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, दुकाने यांच्याकडे स्वतःची पार्किंग उपलब्ध नसल्याने रस्त्यावर वाहन पार्किंग करावं लागते. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. काही महिन्यांपूर्वी नगर परिषदकडून काढण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे स्थितीत जुन्या ठिकाणी बसले आहे.
नवीन शैक्षणिक सत्र सुरु होताच शहरातील काही खाजगी शाळा, कॉन्व्हेन्ट पालकांकडून मनमानी शुल्क वसुली करत आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या गणवेश, पुस्तक, बूट, दप्तर विक्रीच्या नावावर खुलेआम पालकांची लूट सुरु आहे. नर्सरी वर्गात प्रवेशासाठी 10 ते 20 हजार रुपये शुल्क काही इंग्रजी कॉन्व्हेन्ट शाळांकडून आकारण्यात येत आहे. एकीकडे दामदुप्पट रक्कम घेणे सुरू असले तरी दुसरीकडे मात्र स्कूलबसच्या बाबतीत मात्र दुर्लक्ष सुरू आहे. शहरात अनेक स्कूलबस फिटनेस सर्टिफिकिटशिवाय सुरू आहे. चार दिवसांआधीच एका स्कूलबसचा भालर रोडवर अपघात देखील झाला होता.
एक नव्हे तर अनेक समस्यांनी सध्या त्रस्त आहेत. सध्या नगरपालिकेचा प्रभार प्रशासकाकडे आहे. त्यामुळे शहरातील समस्या मांडण्यासाठी व सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधीच नाही. सध्या केवळ आमदार हेच एक लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांसाठी उरले आहेत. आमदार संजीवरेंड्डी बोदकुरवार सध्या मोदी सरकारने 9 वर्षात केलेल्या विकास कामाचा पाढा वाचण्यात व्यग्र आहेत. एकीकडे विकासाचा पाढा सुरू असताना दुसरीकडे आमदार महोदयांचे शहरातील विविध समस्यांकडे मात्र चांगलेच दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वणीकरांना कुणीही वाली उरला नाही असेच म्हणावे लागेल.
हे देखील वाचा:
Comments are closed.