वणी(रवि ढुमणे): वणी उपविभागातील वनोजा-दांडगाव रस्त्याची वाळू भरलेल्या अवजड वाहतुकीने पूर्णतः दुरवस्था झाली आहे. सोबतच वनोजा रस्त्याची डागडुजी करण्याचे कामही सुरू आहे. मात्र खड्डे बुजविणे चालू असताना ते उखडत आहे. त्यामुळे सदर कामाचा दर्जा निकृष्ठ असल्याचे चित्र दिसत आहे.
वर्धा नदीच्या पात्रातील वाळू उपसा करण्याचा लिलाव करण्यात आला होता. परिणामी संबंधित कंत्राटदारांनी नदीतील वाळू उपसा करून ती नेण्यासाठी अवजड वाहनाचा वापर केला आहे. वनोजा-दांडगाव रस्त्याची क्षमता साधारणतः दहा ते बारा टन वजन पेलण्याची असतांना येथून 25 टन व त्यापेक्षा अधिक क्षमता असलेले वाहने भरधाव धावत आहे. या जड वाहतुकीला प्रशासनाचे पाठबळ मिळत आहे. या खेळात मात्र सामान्य लोकांचे हाल होत आहे.
जास्त क्षमतेची वाहने चालत असल्याने जागोजागी जीवघेणे खड्डे पडले आहे. यासंबंधी वणी बहुगुणीने याआधी वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे वनोजा रस्त्यावर थातुरमातुर डांबर टाकून खड्डे बुजवायला सुरुवात झाली आहे. पण समोर खड्डे बुजवीत असतांना मागून जैसे थे खड्डे तयार होताना दिसत आहे. वनोजा गोरज ते दांडगाव व आपटी या मार्गावरून जाणाऱ्या लोकांना जीवघेणी वाटचाल करावी लागत आहे.
एकीकडे शासन या गावाच्या हद्दीतून करोडो रुपयांचा महसूल प्राप्त होत आहे. मात्र या लोकांना सुविधा देण्यास शासन मागेपुढे बघत आहे. प्रशासनाच्या टक्केवारीत सदर रस्त्यांची वाट लागत आहे. सोबतच सामान्य माणसाला वेठीस धरून प्रशासन गलेलठ्ठ होत आहे. एकूणच वनोजा,गोरज,दांडगाव आपटी या मार्गावरील रस्ते तात्काळ दुरुस्त करून जड वाहतूक बंद करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.