ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात या वर्षी कमी पाऊस झाल्याने नवरगावसह लहान मोठे जलसाठे अर्धे अधिक रिकामे आहे. त्यामुळे रब्बीच्या उत्पन्नाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आधीच हतबल झालेल्या शेतक-यांमध्ये पाणी टंचाईमुळे चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.
या वर्षी पाऊस कमी पडल्याने तालुक्यातील नवरगाव धरण, पेंढरी तलाव, धामनी तलाव, महागाव तलाव रामपुर तलावात पाण्याचा खडखडाट आहे. शेतकऱ्यांकड़े गाई, बैल, म्हैस असे अनेक पशुधन असल्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. आता अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन निघाले की चना, गहु, मका आदी रब्बी उत्पादन घेण्यासाठी तयारी करीत आहे. पण कमी पावसामुळे रब्बीच्या उत्पादनाची स्थिती कशी राहील हे सांगणे मात्र कठिण आहे.
गेल्या दोन वर्षांपासून पाणी कमी पडल्याने बळीराजा सुलतानी संकटासोबतच असमानी संकटांचा सामना करत आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस आला त्यामुळे कापसासह सोयाबीनच्या उत्पादनातही फार मोठी घट झाली आहे. एका एकराला तीन ते चार क्लिंटल सोयाबीनचा उतारा येत असल्याने शेतामध्ये सोयाबीनसाठी लावलेला खर्चही निघत नसल्याचे अनेक शेतक-याने बोलून दाखविले. अशीच स्थिती कापसाची आहे, त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक मानसिक दृष्ट्या खचून गेला आहे.
तर दूसरीकड़े शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहण्याऐवजी त्यांची थट्टा करणे सुरू केले आहे. कर्ज माफीच्या नावाखाली शेतक-यांवर अन्याय होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कर्जमाफ़ी तर सोडा, निघालेल्या मालाला योग्य भावही सरकार देत नाही. एकीकड़े शासनाने ठरविलेल्या भावापेक्षा कोणी कमीभावात कापूस सोयाबीन आदी खरेदी करीत असल्यास त्यांच्यावर कार्यवाई करण्याचे आदेश असले, तरी सरकार,कोणातीही कारवाई करित नाही, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याच्या जागी व्यापा-यांच्या सोबत आहे असा आरोप शेतकरी करत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंतेत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.