सावधान ‘शहेनशाह’ येतोय ! वेकोलि कर्मचा-यांनी घेतली धास्ती

रात्री अपरात्री जीएमची कोळसा खाणीला सरप्राईज भेट, शिस्तबद्ध कामामुळे वेकोलिच्या उत्पादनात वाढ

जब्बार चीनी, वणी: मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास वेकोलिच्या खाणीत अचानक सर्वोच्च अधिका-याची एन्ट्री होते. कुणी काम करत आहे. कोण कर्तव्यात कसूर करीत आहे. याची खात्री केली जाते. कुणी कामात कसूर करताना आढळल्यास त्याला तात्काल समज दिली जाते. तर पुढल्या वेळीही कर्तव्यात कसूर आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केले जाते. गेल्या इतक्या वर्षांमध्ये वेकोलिच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडत आहे. याचे प्रामाणिक कर्मचा-यांनी स्वागत केले आहे. तर दुसरीकडे कामचुकार कर्माचा-यांनी याची चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे. हे अधिकारी आहेत वेकोलि वणी उत्तर क्षेत्राचे महाव्यवस्थापक सुनिलकुमार. त्यांनी आता पर्यंत अनेक कर्तव्यात कसूर ठेवणा-या कारवाई केली असून त्यांची आता कर्मचा-यामध्ये रात्री अपरात्री कामासाठी बाहेर निघणारे ‘शहेनशाह’ म्हणून ओळख निर्माण होत आहे.

ऑक्टोबर 2021 मध्ये सुनीलकुमार यांनी वेकोलिच्या वणी नॉर्थ (उत्तर) क्षेत्राच्या महाव्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांच्यापुढे अनेक आव्हाने होती. त्यातील सर्वात महत्त्वाचे आव्हान म्हणजे खाणीतील उत्पादन वाढवणे. दरम्यान त्यांना लक्षात आले की प्रामाणिक कर्माचा-यासोबत कर्तव्यात कसूर ठेवणारे कर्मचारीही आहेत. तसेच अनेक कर्मचा-यांमध्ये कामाबाबत शिस्तीचा अभाव आहे. त्यामुळे त्यांनी सर्वात आधी यावर तोडगा काढण्यास सुरूवात केली.

रात्री अपरात्री खाणीला भेट
अनेकदा कामगार रात्रीच्या शिफ्टमध्ये झोपतात. तर काही कर्मचारी गप्पांचा फड रंगवतता. रात्रीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सुनीलकुमार हे कधी मध्यरात्री 3 वाजता तर कधी पहाटे 4 वाजता एकटेच खाणीत सरप्राईज व्हिजिट देतात. अनेकदा तर याची माहिती त्यांच्या गनमॅनला देखील नसते. या सरप्राईज व्हिजिटमध्ये कुणी कर्तव्यात कसूर करताना आढळल्यास त्यांना आधी तंबी दिली जाते. त्यानंतर पुन्हा आढळल्यास कारवाई केली जाते. या व्हिजिटमुळे आतापर्यंत सुमारे 50 कर्मचारी निलंबित होण्यापासून थोडक्यात बचावले आहेत. तर डझनभर कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचा-यांकडून काम होत नसल्याने त्यांना कार्यालयात दुसरे काम दिले जात आहे. या शिस्तीमुळे वेकोलिचा चांगलाच फायदा होताना दिसत आहे.

वणी वेकोलि उत्तर क्षेत्रामध्ये कोलारपिंप्री, पिंपळगाव, उकणी, जुनाड, घोन्सा, कुंभारखणी आणि राजूर (भांडेवाडा) खाणींचा समावेश आहे. यातील पिंपळगाव व कुंभारखणी खाण बंद आहेत. एक काळ असा होता की उत्पादनाच्या बाबतीत वणी उत्तर क्षेत्र हे संपूर्ण वेकोलिमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असायचे. पण गेल्या दोन वर्षांपासून हा आलेख खाली आला.

ऑक्टोबर 2021 मध्ये WCL मुख्यालयाने या बुडणाऱ्या जहाजाची कमान महाव्यवस्थापक सुनील कुमार यांच्याकडे सोपवली. त्या वेळी या भागातील दैनंदिन कोळसा उत्पादन 920 टन आणि ओबी काढणे 60 हजार 900 टन होते. सध्या या विभागात कोळसा उत्पादन 10 हजार टन आणि ओबीआर 1 लाख 20 हजारांच्या जवळपास आहे. या परिसरात सुमारे 10 नवीन डोझरही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सुनीलकुमार हे कार्यालयापेक्षा फिल्डवरील कामात अधिक रमतात. सकाळी 9.30 वाजता ते कार्यालयात पोहोचतात. त्यानंतर सर्व विभाग, विभाग प्रमुखाच्या भेटी, कार्यालयाची पाहणी करातत. सकाळी 10 वाजता कार्यालयात प्रार्थना घेतली जाते. ज्यात सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित असतात. मंगळवारी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली जाते. तसेच ते रोज खाणीला भेट देतात. त्यात मध्यरात्रीच्या सरप्राईज व्हिजिटचाही समावेश असतो.

कामाचा मोबदला घेत असताना काम योग्य प्रकारे होणे गरजचे आहे. त्यामुळे कर्मचा-यांकडून काम करून घेणे, तसेच सरप्राईज व्हिजिट व खाणीला रोज भेट दिल्यामुळे खाणीत काय त्रुटी आहे, कर्मचा-यांच्या काय समस्या आहे याची योग्य ती माहिती मिळत असते असे ते मानतात. आज वेकोलि वणी उत्तर क्षेत्रातील सर्व विभागप्रमुख, कर्मचारी प्रत्येक आघाडीवर उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आगामी काळात वेकोलि वणी उत्तर क्षेत्र आपली जुनी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होणार असल्याचे दिसून येत आहे.

यांच्या कामाचा धडाका हा केवळ इथेच नाही तर याआधी असलेल्या इतर कार्यालयातही त्यांची कार्यपद्धती तिच आहे. त्यांच्या या शिस्तबद्ध पद्धतीमुळे कर्मा-यांना चांगली शिस्त लागत असून कामात सुसुत्रता आल्याचे कर्मचारी सांगतात. मात्र तसे असले तरी वेकोलिमध्ये सर्वच आलबेल आहे असे नाही. अद्याप त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. ते देखील दूर करणे गरजेचे आहे.

Comments are closed.