चाळीशी ओलांडली असुविधांची…

आठवडी बाजारात मूलभूत सुविधांचा अभाव

0

विवेक तोटेवार, वणी: इथल्या आठवडी बाजाराची चाळीशी कधीचीच ओलांडली. तरीदेखील जवळपास 40 वर्षांपासून वणीच्या जत्रा मैदानात आठवडी बाजार प्रत्येक रविवार भरतो आहे. या चाळीस वर्षात ना जागा बदलली ना कोणतीही सुविधा नगर परिषदेकडून पुरविण्यात आली. गेल्या चाळीस वर्षांपासून नगर परिषदेला लाखो रुपयांचे उत्पन्न हा आठवडी बाजार करून देत आहे. परंतु बाजारात बसणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांना मूलभूत सुविधांचीही व्यवस्था करण्यात येत नाही.

जवळपास 1977 पासून वणीचा आठवडी बाजार भरतो आहे. या बाजारात बाहेरगावांवरून अनेक व्यापारी रविवारी व्यवसाय करण्याकरिता येतात. नगर परिषदेचे ठेकेदार प्रत्येक व्यवसायिकाकडून पावतीच्या नावावर 40 ते 50 रुपये वसूल करतात. याची रीतसर पावतीही दिली जात नसल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली .

या बाजाराची वार्षिक वसुली लाखोंच्या घरात आहे. परंतु या ठिकाणी मूलभूत सुविधांचा पूर्ण अभाव आहे. या ठिकाणी मुतारी, संडास, बसण्याकरिता जागा, शेडची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, बसण्याकरिता ओटे या कोणत्याही सुविधा नाही. महिलांसाठी प्रसाधनगृहच नाही. नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून येत आहे.

ज्या ठिकाणी हा बाजार भरतो तेथे कमालीची अस्वच्छता आहे. एकीकडे सत्ताधारी व नगर परिषद स्वच्छ भारत अभियान राबविते. तर दुसरीकडे बाजारात व्यापाऱ्यांना अतिशय अस्वच्छ जागी बसून व्यवसाय करावा लागतो. त्या जागी बसवायचे पैसेही मोजावे लागतात. ही फार मोठी शोकांतिका आहे.

या ठिकाणी अनेक जण शौचास बसतात. बाजारात मांस विक्रेत्यांची वेगळी व्यवस्था नाही. ते बाजारातील रस्त्यावरच मांसाची विक्री व कटाई करताना सहज दिसून येतात. नगर परिषदेत एकहाती सत्ता मिळल्यानंतर काहीतरी सुधारणा करण्यात येईल अशी आशा वणीकरांना होती. परंतु त्यांची ही आशा धुळीस मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.