ताबिश अपघात प्रकरण: या आधी ही घडली होती वणीत ताबिश सारखीच घटना
जाणून घ्या कोण झालं होतं याआधी बेपत्ता ? कसं उघड झालं होतं बनाव नाट्य ?
वणी: सध्या ताबिश प्रकरणानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पाटाळ्याच्या नदीत ताबिशची गाडी आढळली होती. अद्याप ताबिशची बॉडी सापडली नसल्यानं या प्रकरणाचं गुढ वाढतच चाललं आहे. तसंच ताबिश प्रकरणी विविध तर्कवितर्कही लावले जात आहे. ताबिश भिसीचा व्यवसाय करायचा. त्याचा अद्याप शोध न लागल्यानं ताबिश नदीत की विदेशात या चर्चेला देखील उधाण आलं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सर्व दिशेने तपास केला पण अपघाताचा पुरावा कुठेही आढळला नाही. परिणामी ताबिशचा अपघात की घात, अपहरण नाट्य असे आव्हान पोलीसांसमोर उभे आहे. वणीत याआधीही एक भिसीचालक तरुण बेपत्ता झाला होता. त्यानं एक नाट्य रचलं होतं. जाणून घ्या वणी बहुगुणीची ही एक्सक्लुझिव स्टोरी…
काय होती या आधीची घटना ?
आठ वर्षांपुर्वीची घटना आहे. वणीत सेवानगरात राहणारा एक तरुण कलरिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेण्याचं काम करायचा. त्यासोबतच तो भिसी देखील चालवायचा. भिसीच्या व्यवहारात त्याला लाखोंचा फटका बसला. मेंबर्सचे पैसे बुडल्या गेले. काही मेंबर्सचे पैसे चुकते करण्यासाठी त्यानं काही व्यापारी मित्रांकडून दरमहा व्याजानं कर्ज काढलं. या संपूर्ण भिसीच्या प्रकरणात तो कर्जबाजारी झाला. तर दुसरीकडे भिसीच्या मेंबर्सने त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावला. अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून त्यानं आत्महत्येचा बनाव रचला. एक दिवस त्याची गाडी वरोरा रेल्वे ट्रॅकच्या बाजुला बेवारस परिस्थितीत आढळून आली. दोन दिवसानंतर त्या तरुणाच्या घरच्यांनी त्यांच्या मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात नोंदवली. मात्र त्याचा नंतर शोध लागला नाही.
त्यावेळी भिसीच्या मेंबर्सने पैशासाठी तगादा लावण्यानं त्यानं आत्महत्या केली अशी चर्चा रंगली होती. मात्र जेव्हा कोणतीही डेथ बॉडी न मिळाल्यानं ही चर्चा थांबली. यात एक वर्ष गेलं. दरम्यानच्या काळात या प्रकरणाविषयीची चर्चा थांबली. त्या तरुणाचा मृत्यू झाला की अपहरण याची कोणतीही माहिती कुणाला मिळाली नाही. मात्र एक दिवस या प्रकरणाचा भांडाफोड झाला..
असं उघड झालं बनाव नाट्य…
भिसीचा व्यवसाय अनधिकृत असल्यानं तसंच पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानं भिसीचे मेंबर्स देखील घाबरले होते. त्यामुळे त्यांनी हे प्रकरण विसरण्यातच धन्यता मानली. तर दुसरीकडे बेपत्ता झालेल्या तरुण दुस-या शहरात जाऊन स्थायिक झाला. पण स्थायिक होण्यात त्याला ‘संतोष’ वाटत नव्हता. त्याच्या मनात लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली. त्या तरुणानं एक मुलगीही पसंत केली. लग्नाच्या आधी मुलाची चौकशी करावी म्हणून वधुपक्षाकडील काही मंडळी वणीत आली. त्यांनी तो राहत असलेल्या परिसरात तरुणाची चौकशी केली असता. तो तरुण एक वर्षांपासून बेपत्ता असून त्याची गाडी बेवारस अवस्थेत आढळल्याचं लोकांनी वधुपक्षाच्या मंडळींना सांगितलं. त्यानंतर वधुपक्षाच्या लोकांनी त्या तरुणाचं मुलीसाठी स्थळ आल्याचं सांगितलं आणि हे सर्व बनाव नाट्य उघड झालं.
गेला ताबिश कुणीकडे ?
या आधी वणीत असंच एक प्रकरण घडल्यानं परिसरात ताबिश पळून तर गेला नाही ना अशी चर्चा रंगली आहे. महत्त्वाचं म्हणजे ताबिश देखील भिसीचाच व्यवहार करतो. घटनेच्या दिवशी ताबिश वसूलीकरीता बाहेर गावात गेला होता. दुस-या दिवशी सकाळी त्याची कार पाटाळा येथील वर्धा नदीच्या पुलावरून पाण्यात पडल्याचं आढळून आलं, या अपघाताची सर्व दिशेने पोलीस चौकशी करत आहे. मात्र पोलिसांना कोणताही ठोस पुरावा मिळत नाहीये. त्यामुळे आता पोलिसांनी तपासाची दिशा बदलवली आहे.
(पाटाळा पुलावरील अपघातातील ताबिश नदीत की विदेशात ? )
ताबिशचा अद्याप शोध लागला नाही. पोलीस सर्वच बाजूंनी तपासात गुंतले आहेत. मात्र मुख्य कडी अद्याप पोलीसांच्या हाती लागली नसल्याने ताबिश नदीत की विदेशात असा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीतच आहे.